जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अर्धापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाख

जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अर्धापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणार्या दोघांना अटक केली. या कारवाईत गुटख्यासह चारचाकी वाहन असा एकूण 7 लाख 82 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
11 जुलै रोजी अर्धापूर पोलिसांना हिंगोली येथून नांदेडच्या दिशेने एका कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चोरंबा फाटा परिसरात सापळा रचला. संशयित स्विफ्ट डिझायर कार (एमएच-29-बीसी-2692) अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी सकलेन मुश्ताक देशमुख (वय 26, रा. पेन्शनपुरा, हिंगोली) आणि आरिफ शेख नदीम शेख (वय 27, रा. मस्तानशहा नगर, हिंगोली) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 2 लाख 82 हजार 40 रुपयांचा प्रतिबंधित माल आणि पाच लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 369/2026 नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करीत आहेत. प्रतिबंधित गुटखा पुरवठा साखळीतील अन्य संबंधितांचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, पोलिस उपनिरीक्षक सुरेश भोसले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS