जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत मौजे वाहेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून तब्ब

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत मौजे वाहेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून तब्बल 1 कोटी 75 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. या कारवाईत दोन हायवा ट्रक जप्त करण्यात आले असून अवैध रेती उपशासाठी वापरण्यात येणार्या लोखंडी बोटी, इंजिने आणि तराफे जागेवरच नष्ट करण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 11 जुलै रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या गुन्हे शोध पथकाला वाहेगाव येथील गोदावरी नदीपात्रात विनापरवाना रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच चार जण घटनास्थळावरून फरार झाले, तर दोन आरोपींना दोन हायवा ट्रकसह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत भारत बेंझ कंपनीचा 55 लाख 25 हजार रुपये किमतीचा आणि टाटा कंपनीचा 45 लाख 25 हजार रुपये किमतीचा हायवा जप्त करण्यात आला. तसेच नदीपात्रातून बाहेर काढणे शक्य नसल्याने 30 लाख रुपये किमतीच्या दोन लोखंडी बोटी, 21 लाख रुपये किमतीची सात इंजिने आणि 24 लाख रुपये किमतीचे 40 तराफे व त्यावरील रेती पंचांसमक्ष नष्ट करण्यात आली. याप्रकरणी किरण साहेबराव भुरे आणि अर्जुन बालाजी पवार यांच्यासह चार फरार आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. अवैध रेती उत्खननासह पर्यावरणाची हानी करणार्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

COMMENTS