जम्मू : देशातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या वार्षिक अमरनाथ यात्रेला गुरुवारी औपचारिक सुरुवात झाली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थ

जम्मू : देशातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या वार्षिक अमरनाथ यात्रेला गुरुवारी औपचारिक सुरुवात झाली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत जम्मू येथील भगवती नगर यात्री निवासातून पहिल्या यात्रेकरू ताफ्याला नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
यंदाच्या पहिल्या ताफ्यात एकूण 4 हजार 822 भाविकांचा समावेश असून ते 259 वाहनांमधून अमरनाथ गुहेकडे प्रस्थान करत आहेत. यापैकी 2 हजार 510 यात्रेकरूंनी पारंपरिक पहलगाम मार्गाची निवड केली आहे, तर 2 हजार 312 भाविक बाल्टाल मार्गाने प्रवास करणार आहेत. पहिल्या तुकडीत 3 हजार 707 पुरुष, 816 महिला, 16 बालक, 246 साधू आणि 37 साध्वी सहभागी झाल्या आहेत. यात्रेकरूंच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी 106 बस, 39 मध्यम आकाराची वाहने, 111 लहान वाहने आणि तीन दुचाकींची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार, बाल्टालकडे जाणारा ताफा सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी रवाना झाला, तर पहलगाम मार्गावरील ताफ्याने सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी प्रस्थान केले. संपूर्ण प्रवासादरम्यान बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्यात आले असून सुरक्षा दलाचे जवान ताफ्याबरोबर तैनात करण्यात आले आहेत. यावेळी बोलताना नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि कोणत्याही अडचणीविना पार पडावा यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेदरम्यान आरोग्यसेवा, स्वच्छता, निवास, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या स्वागतार्थ तावी नदी परिसरातील आरती कार्यक्रम आणि ध्वनी-प्रकाश सादरीकरणाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. मनोज सिन्हा म्हणाले की, श्रद्धा, शिस्त आणि अध्यात्म यांचे अनोखे संगम असलेली अमरनाथ यात्रा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत राहिली आहे. देशाच्या विविध भागांतून, विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे भाविक या यात्रेत सहभागी होतात आणि श्रद्धेच्या एका समान धाग्याने एकत्र येतात. देशभरातील नागरिकांनी या पवित्र आणि आध्यात्मिक यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

COMMENTS