Homeताज्या बातम्यादेश

रायगडावरील विविध कामांसाठी बैठक घेणार

सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांची छत्रपती संभाजीराजेंना आश्‍वासन

नवी दिल्ली : येत्या 6 जून रोजी 350 वा शिवराज्याभिषेक दिन येत आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध विषयांसंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी आज दिल्ली येथे

संगमनेरमध्ये बांधकाम मजुरांचा शनिवारी मोर्चा
नगर तालुक्यातील 44 गावांच्या पाणी योजनेची वीज तोडली
सलमान खानचा ‘गजनी’ लूक व्हायरल

नवी दिल्ली : येत्या 6 जून रोजी 350 वा शिवराज्याभिषेक दिन येत आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध विषयांसंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी राजेंनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच रायगडास भेट देऊ, तसेच या अनुषंगाने संबंधितांची बैठक घेणार असल्याचे आश्‍वासन सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी संभाजीराजेंना दिले.
दुर्गराज रायगडवर भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने जी कामे सुरू केलेली आहेत व प्रलंबित आहेत, ती 6 जूनच्या पूर्वी तात्काळ पूर्ण करावीत, याबाबत भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांचीही संभाजीराजे यांनी भेट घेऊन रीतसर निवेदन दिले. यामध्ये मुख्यत्वे राजसदर संवर्धन कार्याचा समावेश आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 350 व्या शिवराज्याभिषेक महोत्सवानिमित्त रायगडच्या नगारखाना वास्तूचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने नगारखान्यास पूर्वी होते, त्या पद्धतीचे ऐतिहासिक छत बसवावे. नगारखान्यावर पूर्वी छत अस्तित्वात होते, याबाबतचे वास्तू अवशेषात्मक पुरावे देखील यावेळी सांस्कृतिक मंत्री व पुरातत्व विभागास त्यांनी सादर केले. याविषयी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, पावसाळ्यात नगारखान्यास मोठ्या प्रमाणात गळती लागते. यामुळे या वास्तूस धोका पोहोचत असून याचे ऐतिहासिक बांधकाम कमकुवत होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नगारखान्यास छत बसविल्यास बांधकामातून होणारी गळती थांबवून आपण या वास्तूचे संवर्धन करू शकू, शिवाय नगारखान्याला त्याचे ऐतिहासिक शिवकालीन स्वरूप देखील परत प्राप्त होईल. या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षात हे काम सुरू होऊन ते पूर्ण व्हावे, यासाठी मी पूर्णतः प्रयत्न सुरू केलेले असून सर्व स्तरांवर त्यासाठी पाठपुरावा करीत आहे, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी केले. यासाठी तात्काळ स्वतः केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री, रायगड विकास प्राधिकरण, सांस्कृतिक विभागांचे सचिव, पुरातत्व विभाग, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाचे संबंधित अधिकारी वर्ग यांची एकत्रित बैठक बोलवावी, अशीही मागणी केली. तसेच, मंत्री महोदयांना किल्ले रायगड भेटीस निमंत्रित केले. यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच रायगडास भेट देण्यासह याविषयीची बैठक बोलावू, अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री यांनी दिली.

COMMENTS