बारामती : बारामती विमानतळावर प्रशिक्षण सराव सुरू असताना विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना रविवारी घडली. या विमानातील कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे
बारामती : बारामती विमानतळावर प्रशिक्षण सराव सुरू असताना विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना रविवारी घडली. या विमानातील कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि प्रशिक्षणार्थी अभिजित जुंदरे हे दोघेही सुखरूप असून, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
घटनेनंतर विमान कोसळल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, उपमुख्यमंत्री तथा बारामतीच्या आमदार सुनेत्रा पवार यांनी विमान कोसळल्याचे वृत्त स्पष्टपणे फेटाळले. विमानाने अद्याप आकाशात उड्डाण केलेलेच नव्हते. धावपट्टीवर असताना वळण घेताना त्याचे एक चाक बाजूला अडकल्याने ते धावपट्टीवरून घसरल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, विमानातील दोन्ही व्यक्ती सुरक्षित असल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विमानाची पाहणी करून घटनेची नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेशी संबंधित चित्रफितही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली आहे.
बारामती विमानतळावरच यापूर्वी याच वर्षी २८ जानेवारी रोजी गंभीर विमान दुर्घटना घडली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांचे पती अजित पवार यांचे विमान उतरत असताना दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रविवारी बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेत विमानाने उड्डाण केलेले नसून केवळ धावपट्टीवरून घसरल्याचे स्पष्ट झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे दिसून आले.

COMMENTS