नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाने कठोर पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघा

नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाने कठोर पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांची पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी ’एक्स’वरील पोस्टद्वारे दिली. मात्र, पक्षाकडून अद्याप अधिकृत पत्र किंवा घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टीकर कुटुंबातील राजकीय भूकंपाने आधीच खळबळ उडवली होती. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी मात्र आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचा दावा केला होता. पण निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याच काळात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर पिता-पुत्रांवर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही बाजूंमधील दुरावा टोकाला गेल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. पराभवानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी वडिलांच्या विरोधात जाणार नाही. त्यांचे जंगी स्वागत करणार, अशी भूमिका जाहीरपणे मांडत कुटुंबीय नातेसंबंधांना प्राधान्य दिले. मात्र, याच विधानामुळे ठाकरे गटातील संताप आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत शिंदे गटाची अप्रत्यक्ष मदत घेतल्याचा आरोप, त्यानंतर वडिलांच्या राजकीय भूमिकेशी साधलेले सूर आणि पराभवानंतरची भूमिका यामुळे ठाकरे गटाने अखेर कठोर निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कृष्णा पाटील आष्टीकर यांची पुढील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने होणार, तेही लवकरच शिंदे सेनेचा भगवा हाती धरणार का, याकडे आता संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS