मुंबई : मुंबई फिरण्यासाठी मित्रासोबत आलेल्या १७ वर्षीय तरुणाचा धावत्या लोकल मधून गिरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कळवा स्

मुंबई : मुंबई फिरण्यासाठी मित्रासोबत आलेल्या १७ वर्षीय तरुणाचा धावत्या लोकल मधून गिरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कळवा स्थानक परिसरात हा अपघात झाला. भिवंडीतील बाला कंपाउंड परिसरात राहणाऱ्या मोहम्मद फाझील शफीक अंसारी या तरुणाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फाझील हा मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी घरातून निघाला होता. भिवंडीहून कल्याण आणि त्यानंतर कल्याणहून मुंबईच्या दिशेने तो लोकलने प्रवास करत होता. कळवा स्थानकाच्या आसपास लोकल धावत असताना फाझील दरवाज्याजवळ उभा होता. त्याचवेळी अचानक त्याचा हात निसटला आणि तोल गेल्याने तो धावत्या लोकल मधून खाली पडला. या दुर्घटनेत फाझीलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला खाली पडताना पाहून त्याच्या मित्राने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने जखमी फाझीलला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फाझील हा आई-वडिलांचा मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. अवघ्या १७व्या वर्षी मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच बाला कंपाउंड परिसरात शोककळा पसरली.

COMMENTS