नांदेड : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेड शहरात आज सामाजिक शक्तीचा विराट आविष्कार पाहायला मिळाला. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल

नांदेड : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेड शहरात आज सामाजिक शक्तीचा विराट आविष्कार पाहायला मिळाला. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या महामोर्च्यात लाखो बांधव सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. प्रचंड जनसमुदाय, आक्रमक घोषणाबाजी आणि आरक्षणाच्या हक्कासाठीचा बुलंद आवाज यामुळे संपूर्ण नांदेड शहर दुमदुमून गेले.
या विराट महामोर्च्याचे नेतृत्व सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री बबनराव घोलप आणि परशुरामजी इंगोले यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख नेत्यांनी केले. आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे सामाजिक न्यायाच्या मूळ संकल्पनेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत आंदोलकांनी शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “आरक्षण आमच्या हक्काचे आहे, त्याचे विभाजन मान्य नाही”, अशा घोषणांनी मोर्च्याचा परिसर दणाणून गेला.
महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महामोर्च्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हजारोच्या संख्येने सहभागी झालेले आंदोलक विविध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. मोर्च्यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्च्याच्या मार्गावर सर्वत्र आंदोलकांची गर्दी दिसून येत होती. हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची एकजुट या महामोर्च्याच्या माध्यमातून प्रकर्षाने दिसून आली. आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करून उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आरक्षण हा केवळ सवलतीचा विषय नसून सामाजिक प्रतिनिधित्व आणि घटनात्मक हक्काचा प्रश्न आहे, अशी भूमिका महामोर्च्याच्या माध्यमातून मांडण्यात आली. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका समाजाचा नसून सामाजिक न्यायाच्या व्यापक लढ्याचा भाग असल्याचेही वक्त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामोर्च्याचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी प्रमुख नेत्यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टीका करत आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. आनंदराज आंबेडकर, चंद्रकांत हंडोरे, बबनराव घोलप आणि परशुरामजी इंगोले यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. आरक्षणाच्या हक्कासाठी घटनात्मक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
नांदेडमध्ये शक्तीप्रदर्शन; पुढील लढ्याकडे लक्ष या महामोर्च्यामुळे नांदेडमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने आयोजकांनी हा मोर्चा “आरक्षणाच्या हक्कासाठीचा निर्णायक एल्गार” असल्याचे म्हटले आहे. आता महामोर्च्याच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे आंदोलकर्त्यांचे आणि समाजबांधवांचे लक्ष लागले आहे. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

COMMENTS