मुंबई : राज्यातील काही भागांत सध्या पावसाची हजेरी लागत असली, तरी अनेक ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्या

मुंबई : राज्यातील काही भागांत सध्या पावसाची हजेरी लागत असली, तरी अनेक ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे हवामानात बदल होत असतानाच देशाच्या विविध भागांत निर्माण झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनला पुन्हा बळ मिळण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे आगामी काही दिवसांत देशातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
नैऋत्य उत्तर प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यानंतर शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी दक्षिण गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल तसेच लगतच्या उत्तर ओडिशामध्ये आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. या दोन्ही हवामान प्रणालींचा परिणाम एकत्रितपणे होण्याची शक्यता असल्याने देशातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर त्याकडे मोठ्या प्रमाणावर आद्रता खेचली जाते. हे क्षेत्र पुढे सरकत असताना त्याच्या प्रभावक्षेत्रात ढगांची निर्मिती वाढते. परिणामी काही ठिकाणी जोरदार, तर काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होते. यापूर्वी जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या तसेच अखेरच्या आठवड्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला होता.
हवामान विभागाच्या ऑगस्ट महिन्यासाठीच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात राज्यातील काही भागांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाची स्थिती पुन्हा सुधारते का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीवर होण्याची शक्यता असून, राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.
राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदाच्या पावसाळ्यात राज्यात आतापर्यंत ६३७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत सरासरी ६२२.७ मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. त्यामुळे राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत सुमारे दोन टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, राज्यातील सर्वच विभागांमध्ये पावसाचे समान वितरण झालेले नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे.

COMMENTS