मुंबई: NEET पेपर फुटीविरोधात मुंबईत विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यां
मुंबई: NEET पेपर फुटीविरोधात मुंबईत विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांच्या गाडीतच अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत मुंबई पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला सध्याच्या नियुक्तीवरून हटवले असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
‘दहिसरकर’ या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गाडीत काही आंदोलनकर्ते विद्यार्थी बसलेले दिसत आहेत. विद्यार्थी शांत न बसल्याने पोलीस गाडीतील एक कर्मचारी त्यांना थेट धमकी देताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. “फिर मेरे जैसा कोई बेकार आदमी नही, वापीस इधर किधर मिला तो ५०-५० ग्रॅम पावडर डाल देगा जेब मैं, फिर गया तू… फिर ना जामीन मिलेगी!” अशा स्पष्ट शब्दांत हा पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देताना ऐकू येत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वसामान्यांसह राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली जात असेल, तर ही लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला धक्का देणारी बाब ठरत आहे.
मुंबई पोलिसांकडून तातडीने कारवाई
या व्हिडिओची मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे. पोलिसांकडून व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी केली जात असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि अहवाल येईपर्यंत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या सध्याच्या नियुक्तीवरून हटवण्यात आले आहे. चौकशीअंती दोषींवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

COMMENTS