पुरोगामी महाराष्ट्रात आज गुन्हेगारी प्रवृत्तीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून राज्यात फडणवीस सरकार आहे की भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्यां

पुरोगामी महाराष्ट्रात आज गुन्हेगारी प्रवृत्तीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून राज्यात फडणवीस सरकार आहे की भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्यांचे राज्य, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केली आहे.
राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचा निषेध करत डॉ. रॅपनवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार टीका केली. प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून राज्य देशात गुन्हेगारीच्या बाबतीत आघाडीवर पोहोचले आहे. सत्ताधार्यांच्या राजाश्रयामुळे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे राज्यात भोंदू साधू, गुन्हेगार आणि अत्याचारी प्रवृत्तींचा सुळसुळाट झाल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील काही तथाकथित भोंदू साधूंवरील भ्रष्टाचार व अत्याचाराच्या प्रकरणांमुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली असून नांदेड, पुणे यांसारख्या शैक्षणिक व सांस्कृतिक शहरांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. एकाच शहरात दिवसाढवळ्या अनेक खून होत आहेत. महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. विकास आणि संस्कारांची भाषा करणार्या सत्ताधार्यांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आळंदी येथे विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा उल्लेख करत डॉ. रॅपनवाड म्हणाले की, संग्रामपापू नावाच्या गुंडासह त्याच्या सहकार्यांनी केलेला हा भ्याड हल्ला म्हणजे विचारस्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. अशा प्रवृत्तीला तात्काळ आळा घालून संबंधित आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

COMMENTS