श्रीगोंदा : शहरातील प्रमुख चौकांमध्ये सध्या विविध राजकीय नेत्यांच्या वाढदिवस, स्वागत व अभिनंदनाचे मोठमोठे बॅनर झळकत असून शहर बॅनरयुक्त झाले

श्रीगोंदा : शहरातील प्रमुख चौकांमध्ये सध्या विविध राजकीय नेत्यांच्या वाढदिवस, स्वागत व अभिनंदनाचे मोठमोठे बॅनर झळकत असून शहर बॅनरयुक्त झाले आहे. मात्र दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे “बॅनरयुक्त श्रीगोंदा कधी होणार खड्डेमुक्त?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.शहरातील बगाडे कॉर्नर, अण्णा भाऊ साठे चौक, शनी चौक, बायपास रस्ता, तहसील कार्यालय परिसर, श्रीगोंदा पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, कोर्ट रोड तसेच इतर प्रमुख मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला व शालेय विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताचा धोका देखील दिवसेंदिवस वाढत आहे.सरस्वती नदीलगतच्या बायपास रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नगरपालिकेच्या साफसफाई व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, नगरपालिका, राज्य आणि केंद्र अशा तिन्ही स्तरांवर भाजपची सत्ता असतानाही शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. विकासाच्या घोषणा आणि मोठमोठे बॅनर यापेक्षा नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त रस्ते आणि स्वच्छ शहर अधिक महत्त्वाचे असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.विशेषतः शनी चौक हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक असून येथे राजकीय बॅनरांनी संपूर्ण परिसर व्यापलेला दिसतो. मात्र त्याच चौकातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे आणि वाहतुकीच्या समस्येकडे नगरपरिषद व लोक प्रतिनिधी यांचे कोणाचेच लक्ष नसल्याचे चित्र दिसून येत आहे.नागरिकांनी नगरपालिकेसह संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, बायपास परिसरातील कचरा हटवावा आणि शहराला स्वच्छ व सुरक्षित बनवावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेतदुरावस्थेस राजकीय उदासीनताच कारणीभूतशनी चौक परिसरात राजकीय फलकांची रेलचेल दिसते. मात्र रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि पावसाचे साचलेले पाणी शहराच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. याला राजकीय उदासीनताच कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

COMMENTS