देगलूर : देगलूर नगरपरिषद हद्दीतील संतोष बार ते पिरोजदिन टाकीज परिसरात नुकतेच सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी रस्त्य

देगलूर : देगलूर नगरपरिषद हद्दीतील संतोष बार ते पिरोजदिन टाकीज परिसरात नुकतेच सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी रस्त्यावर जागोजागी उघडे खड्डे सोडण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयांचा विकासाचा दावा केला जात असताना नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरच जीवघेणे खड्डे असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे उघडे खड्डे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचे कारण ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात किंवा पावसाचे पाणी साचल्यानंतर हे खड्डे दिसून येत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चारचाकी वाहनांनाही या खड्ड्यांचा फटका बसत असून अनेक वाहने अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक ट्रॅक्टर खड्ड्यात अडकला होता. त्यानंतरही अनेक चारचाकी वाहने अडकल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रोजचा प्रवास धोकादायक बनला आहे. नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित ठेकेदार, अभियंते आणि नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करताच रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. जर हे खड्डे चेंबर, नाले किंवा इतर तांत्रिक कामांसाठी ठेवण्यात आले असतील, तर त्या ठिकाणी बॅरिकेड्स, इशारा फलक, परावर्तित पट्ट्या किंवा अन्य सुरक्षेची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र कोणतीही खबरदारी न घेतल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या विकासकामांमध्ये अशा प्रकारचा हलगर्जीपणा अस्वीकार्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. देगलूर नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील सर्व उघडे खड्डे सुरक्षितपणे बुजवावेत किंवा उर्वरित काम त्वरित पूर्ण करून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरक्षित करावा. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS