Homeताज्या बातम्या

शेवगावात शिंदे गटाकडून दोन स्वतंत्र शक्तीप्रदर्शन; आमदार विलास भुमरेंच्या दौऱ्यानंतर अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

शेवगाव: पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्या शेवगाव दौऱ्यादरम्यान शिंदे गटातील दोन वेगवेगळ्या गटांनी स्वतंत्रपणे त्यांचे स

हिंदू खाटीक समाजासाठी कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज मागविले; नांदेड जिल्हा कार्यालयाचे आवाहन
निर्भीड पत्रकार संघाच्या परळी तालुका अध्यक्षपदी बालाजी ढगे, उपाध्यक्षपदी कृष्णा सरवदे यांची बिनविरोध निवड
मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दिपके कुटुंबियांची भेट; अभिजीत यांच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार

शेवगाव: पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्या शेवगाव दौऱ्यादरम्यान शिंदे गटातील दोन वेगवेगळ्या गटांनी स्वतंत्रपणे त्यांचे स्वागत व सत्कार केल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या दौऱ्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उघड झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

आमदार भुमरे यांनी प्रथम शेवगाव येथील एका निवासस्थानी सदिच्छा भेट देत कुटुंबीयांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलेला सत्कार स्वीकारला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, पैठणचे नगरसेवक भूषण कावसानकर, शेखर शिंदे, महेश मुंदडा, जिल्हा परिषद सदस्य सुरेश तोडावत, दत्ताभाऊ खेडकर, नगरसेवक रफिक कादरी, सरपंच किशोर चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विविध सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर यावेळी मनमोकळा संवादही झाला.

यानंतर आमदार भुमरे यांनी शेवगाव तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा नगरसेवक आशुतोष डाहळे यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल, युवा सेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, कैलास तिजोरे, सुनील काकडे, जाकिर कुरेशी, अमर पुरणाळे, प्रवीण भारस्कर, संतोष जाधव, बाबासाहेब लांडे, राहुल मगरे, विक्रांत लांडे, आशुतोष पुरणाळे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आमदार भुमरे यांचा एका बाजूला अरुण मुंढे गटाने, तर दुसऱ्या बाजूला आशुतोष डाहळे व ताहेर पटेल यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सत्कार केल्याने शिंदे गटातील दोन स्वतंत्र राजकीय केंद्रे स्पष्टपणे दिसून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे भविष्यात शिंदे गटात मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आगामी नगराध्यक्षपदाच्या राजकारणाच्या अनुषंगाने विविध समीकरणांची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. आमदार भुमरे यांच्या या दौऱ्यामुळे आगामी स्थानिक राजकारणाची दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

शिवसेना ही सर्वसामान्यांच्या विश्वासावर उभी राहिलेली संघटना: आ. भुमरे

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार भुमरे म्हणाले की, “शिवसेना ही सर्वसामान्यांच्या विश्वासावर उभी राहिलेली संघटना असून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने काम करावे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा.” तसेच शेवगाव तालुक्यातील संघटनात्मक काम समाधानकारक असल्याचे सांगत आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS