श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय ब्रिज कोर्स पार पडला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देणे, उच्च शिक्षणाच्या विविध संधींची माहिती देणे आणि भविष्यातील करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ब्रिज कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, इंटरनेट पॅनलच्या साहाय्याने सादरीकरणे तसेच संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साळवे यांनी संस्था व महाविद्यालय परिचय या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रयत शिक्षण संस्थेची गौरवशाली परंपरा, महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांनी जपावयाची शिस्त याविषयी सविस्तर माहिती दिली.
ब्रिज कोर्समध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन, शिस्त, क्रीडा विभागातील संधी, सांस्कृतिक उपक्रम, कमवा व शिका योजना तसेच महाविद्यालयातील विविध विद्यार्थी विकास कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. याशिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांतील मूलभूत संकल्पना स्पष्ट करून पुढील अभ्यासासाठी आवश्यक पायाभूत ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले.
मराठी विषयांतर्गत संवाद कौशल्य, सूत्रसंचालनाचे तंत्र, इंग्रजी विषयाचे उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांमधील महत्त्व यावरही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. पाच दिवस चाललेल्या या ब्रिज कोर्समुळे विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन शिक्षणाबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअर नियोजनाबाबत स्पष्ट दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयातील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि विविध समित्यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

COMMENTS