Homeताज्या बातम्या

राज्यात खरीप पेरण्यांना वेग; 74 टक्के पेरणी पूर्ण

मुंबई : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकर

कृषी खात्यातील निविष्ठा खरेदी भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करातुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी – वसंत मुंडे
कर्जत बाजार समितीत सोमवार-गुरुवारी नियमित लिलाव : तापकीर    
जेव्हा थेट महसूलमंत्र्यांचा शेतकरी प्रतिनिधीला फोन येतो…


मुंबई : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकर्‍यांना पेरण्या पुढे ढकलाव्या लागल्या. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाचा असमान पडलेला मारा कायम राहिल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या आठवडाभरात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, ऊस वगळता राज्यातील सरासरी खरीप क्षेत्रापैकी 20 जुलैअखेर सुमारे 74 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. राज्यातील सरासरी 144.36 लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 106.79 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा 1 जून ते 20 जुलै या कालावधीत राज्यात सरासरी 421 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत 88 टक्के पेरणी झाली होती, तर यंदा ती 74 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. विभागनिहाय पाहता, अमरावती विभाग सर्वाधिक 89 टक्के पेरणीसह आघाडीवर आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात 79 टक्के, नाशिक विभागात 78 टक्के, लातूर विभागात 77 टक्के, कोल्हापूर विभागात 63 टक्के, तर पुणे आणि नागपूर विभागात प्रत्येकी 61 टक्के पेरणी झाली आहे. कोकण विभागात मात्र केवळ 15 टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली आहे.
सोयाबीन पिकाच्या लागवडीत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून 113 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत 87 टक्के, तर बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत 88 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड पूर्ण झाली आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ही टक्केवारी 70 इतकी आहे. तूर पिकाच्या पेरणीत नाशिक विभाग 121 टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्याखालोखाल अमरावती विभागात 91 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात 86 टक्के, कोल्हापूर विभागात 83 टक्के, नागपूर विभागात 78 टक्के, पुणे विभागात 62 टक्के आणि लातूर विभागात 57 टक्के पेरणी झाली आहे. मका पिकाच्या लागवडीत अमरावती विभागाने 142 टक्के क्षेत्र गाठले असून नाशिक विभागात 128 टक्के, कोल्हापूर विभागात 100 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात 94 टक्के, पुणे विभागात 88 टक्के, नागपूर विभागात 85 टक्के आणि लातूर विभागात 42 टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. राज्यात अलीकडील समाधानकारक पावसामुळे उर्वरित क्षेत्रातील पेरण्याही लवकर पूर्ण होतील, असा विश्‍वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

COMMENTS