जामखेड: विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही लोकशाहीची शोकांतिका आहे. त्यांच्यावर दडपशाही नव्हे तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांवर हल्ला

जामखेड: विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही लोकशाहीची शोकांतिका आहे. त्यांच्यावर दडपशाही नव्हे तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे नेमके कोण होते? ते कोठून आले? त्यांच्या हातात दांडके कसे आले? वाहनांमध्ये दगड कोठून आणले गेले? या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केला. तसेच नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली.
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठीमाराचे गुरुवारी जामखेड शहरात तीव्र पडसाद उमटले. वंचित बहुजन आघाडीसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी शहरात कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार धनंजय बांगर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, शिवसेना (उबाठा), प्रहार जनशक्ती पक्ष, काँग्रेस, आदिवासी संघटना, लोकाधिकार आंदोलन आणि मुस्लिम पंच कमिटी आदी विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. जामखेड शहरातील व्यापाऱ्यांनीही आपली आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
इंग्रजांच्या काळातील जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना दिल्लीतील जंतर-मंतर येथे घडली असून, न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार हा लोकशाहीवरील थेट आघात असल्याची टीका यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाच्या समारोपावेळी दिल्लीतील आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS