Homeराजकारण

शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या बेपर्वाईमुळेच शिक्षक मोरे आत्महत्या प्रकरण घडले? शिक्षण विभागाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह

नांदेड: मानेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी तब्बल वर्षभरापूर्वी आपल्या मानसिक छळाबाबत दहा पानी सविस्तर तक्र

देशाची शिक्षणव्यवस्था सत्ताधाऱ्यांनी नष्ट केली; खासदार राहुल गांधींचा भाजप सरकारवर हल्लाबोल
मुंबईत वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारणीसाठी तातडीने कारवाई करा; मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रशासनाला निर्देश
आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव

नांदेड: मानेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी तब्बल वर्षभरापूर्वी आपल्या मानसिक छळाबाबत दहा पानी सविस्तर तक्रार शिक्षण विभागाकडे सादर केली होती. मात्र या गंभीर तक्रारीची प्रशासनाने वेळेत दखल घेतली का, चौकशी नेमकी कुठपर्यंत पोहोचली आणि संबंधितांवर कोणती कारवाई झाली का, याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी हदगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि स्थानिक तक्रारदारांच्या निवेदनानंतर गटशिक्षण अधिकार्‍यांनी तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय पवळे व विद्यमान मुख्याध्यापक सुनील मोरे यांच्या कार्यकाळाची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान पवळे यांच्या कार्यकाळात कोविड काळातील तांदूळ वितरण, विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देय असलेली प्रति विद्यार्थी ३१३ रुपयांची रक्कम न वितरित करणे, व्हीजेएनटी भत्त्याच्या अपूर्ण नोंदी तसेच शाळेच्या खात्यातील ५८ हजार रुपयांहून अधिक शिल्लक रकमेबाबत गंभीर आर्थिक व प्रशासकीय त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली होती.

दुसरीकडे, सुनील मोरे यांनी बहुतांश कामकाज नियमानुसार केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. मात्र चौकशी समितीवर अविश्वास दाखवणे, अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरण करणे आणि चौकशीस पूर्ण सहकार्य न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर मोरे यांनी चौकशी समितीतील कथित पक्षपातीपणा आणि गटशिक्षणाधिकारी फुले यांच्यासह चौघांकडून होत असलेल्या मानसिक छळाबाबत शिक्षणाधिकार्‍यांना दहा पानी सविस्तर तक्रार दिली होती. या पत्रात त्यांनी मुद्देनिहाय छळाच्या घटनांचा उल्लेख करून न्यायाची मागणी केली होती.

मात्र या गंभीर निवेदनावर वेळेत ठोस कार्यवाही न झाल्याने मोरे सतत मानसिक तणावाखाली राहिल्याची चर्चा आता शिक्षण वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच त्यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मोरे यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी चौकशीची सूत्रे हाती घेताच प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या दोन दिवसांपासून मोठी धावपळ सुरू झाली. पोलिसांनी मागविलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात अधिकारी व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले.

बुधवारी आवश्यक माहिती तयार करून ती कार्यकारी अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आली असून त्यानंतर ती पोलिसांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. मोरे यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने अशीच तत्परता दाखवून वेळेत चौकशी पूर्ण केली असती, तर आज जिल्हा परिषदेला या नामुष्कीला सामोरे जावे लागले नसते, अशी चर्चा जिल्हा परिषद परिसरात जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणात पोलिस तपासातून नेमके वास्तव समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS