महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच सत्तेच्या समीकरणांचा केंद्रबिंदू राहिला आहे. सहकार, ग्रामीण सत्ता, आर्थिक जाळे आणि

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच सत्तेच्या समीकरणांचा केंद्रबिंदू राहिला आहे. सहकार, ग्रामीण सत्ता, आर्थिक जाळे आणि प्रभावी नेतृत्व यांच्या जोरावर उभा राहिलेला हा पक्ष अनेक वादळांतून बाहेर पडला. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याऐवजी सध्या सुरू असलेली अंतर्गत सुंदोपसुंदी राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. पक्षात विचारांचे नेतृत्व नाही, तर वारसाहक्कासाठी चाललेली धुसफूस आहे, असे चित्र उभे राहत आहे.
सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा हातात घेतल्यानंतर राष्ट्रवादी अधिक संघटित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. पण वास्तव त्याच्या उलट दिसत आहे. नव्या संघटनात्मक बदलांमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांना महत्त्वाच्या भूमिका देण्यात आल्याने अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. ज्यांनी दशकानुदशके पक्षासाठी संघर्ष केला, सत्ता उभी केली, निवडणुका जिंकल्या, त्यांनाच अचानक दुय्यम स्थान मिळू लागल्याची भावना पक्षात पसरली आहे. राष्ट्रवादीची ही समस्या केवळ व्यक्तींच्या नाराजीपुरती मर्यादित नाही, तर ही समस्या पक्षाच्या संस्कृतीची आहे. महाराष्ट्रात अनेक पक्ष घराणेशाहीच्या आरोपांना सामोरे गेले; पण राष्ट्रवादीने स्वतःला नेहमी संघटनात्मक पक्ष म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. आता मात्र त्या मुखवट्यावरील रंग उडू लागला आहे. पक्षातील निर्णय प्रक्रिया काही मोजक्या व्यक्तींमध्ये केंद्रित होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, जुन्या नेत्यांच्या मनातील नाराजी आता उघडपणे बाहेर येऊ लागली आहे.
सुनील तटकरे यांचे वक्तव्य याच अस्वस्थतेचे प्रतीक मानावे लागेल. “मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोलेन,” हे त्यांचे विधान साधे नव्हते. चार दशकांहून अधिक राजकीय अनुभव असलेला नेता अशा प्रकारे सूचक इशारा देतो, याचा अर्थ पक्षात काहीतरी गंभीर खदखद सुरू आहे. तटकरे यांनी उघड बंडाचे संकेत दिले नसले, तरी त्यांनी व्यक्त केलेली नाराजी ही नेतृत्वासाठी धोक्याची घंटा आहे. प्रफुल्ल पटेल यांचे मौनही तितकेच बोलके आहे. राष्ट्रीय पातळीवर संपर्क असलेले, धोरणात्मक राजकारणात निपुण मानले जाणारे पटेल यांना संघटनेत मागे टाकले जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसताच राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली. एखाद्या पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कमी होऊ लागला की, तिथे संघटन कमकुवत होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.
या पार्श्वभूमीवर ‘सिल्व्हर ओक’वरील गुप्त भेटींनी संशय अधिक गडद केला. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. ही भेट केवळ प्रकृतीची चौकशी होती, हा दावा कोणीही सहज मान्य करणार नाही. कारण राजकारणात भेटींचे अर्थ शब्दांपेक्षा अधिक खोल असतात. विशेषतः राष्ट्रवादीसारख्या पक्षात, जिथे प्रत्येक हालचालीमागे सत्ता आणि भविष्यातील समीकरणे दडलेली असतात. या भेटींमधून एक गोष्ट स्पष्ट होते – अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाविषयी एकमत नाही. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारताना अनेक नेत्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. कारण राजकारण हे केवळ नातेसंबंधांवर चालत नाही; त्यासाठी जनाधार, संघटन कौशल्य आणि राजकीय वजन आवश्यक असते. केवळ कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे नेतृत्व आपोआप स्वीकारले जाईल, ही अपेक्षा वास्तववादी नाही.
राष्ट्रवादीच्या सध्याच्या स्थितीत सर्वात मोठी समस्या म्हणजे विश्वासाचा अभाव. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना वाटते की त्यांचे योगदान दुर्लक्षित केले जात आहे. दुसरीकडे नव्या नेतृत्वाला वाटते की पक्षावर नियंत्रण टिकवण्यासाठी कुटुंबकेंद्रित रचना मजबूत करणे आवश्यक आहे. या संघर्षातून निर्माण झालेली दरी दिवसेंदिवस वाढत आहे. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतचे (NDA) संबंध. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना सत्तेत राहणे महत्त्वाचे वाटते, तर काहींना पक्षाची स्वतंत्र ओळख टिकवण्याची चिंता आहे. त्यामुळे पक्षात दोन विचारधारा निर्माण झाल्याचे दिसत आहे. एक गट सत्तेसाठी कोणतीही तडजोड करण्यास तयार आहे, तर दुसरा गट स्वाभिमान आणि स्वतंत्र अस्तित्वाचा मुद्दा पुढे करत आहे.
सुनेत्रा पवार यांनी गुवाहाटीहून परतताना स्वतःच्या वरिष्ठ नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रवास केल्याची चर्चा देखील प्रतीकात्मक ठरली. राजकारणात अशा छोट्या घटना मोठे संदेश देतात. यामुळेच तटकरे आणि पटेल यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिक खतपाणी मिळाले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवून नवे सत्ता-संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संदेश या घटनांमधून गेला. राष्ट्रवादीसमोरील खरी अडचण म्हणजे नेतृत्वाचा संक्रमणकाळ. शरद पवारांच्या करिश्म्यावर उभा राहिलेला पक्ष आता त्यांच्या सावलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो प्रयत्न सुसंघटित नाही. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षात किमान निर्णयक्षमतेची स्पष्टता होती. आज मात्र प्रत्येक नेता स्वतःच्या भवितव्याचा हिशेब मांडताना दिसतो आहे. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे; पण जेव्हा मतभेद नेतृत्वावरील अविश्वासात बदलतात, तेव्हा पक्षाचे अस्तित्व धोक्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या त्याच टप्प्यावर उभी आहे. बाहेरून एकत्र असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी आतून पक्षात संशय, नाराजी आणि सत्तासंघर्ष उफाळून आला आहे.
महाराष्ट्राच्या मतदारांनी अनेकदा पाहिले आहे की, अंतर्गत भांडणांनी पक्षांचे कसे नुकसान होते. शिवसेनेतील फूट असो किंवा काँग्रेसमधील गटबाजी, शेवटी नुकसान कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचेच होते. राष्ट्रवादीतही तीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. आज पक्षातील नेते जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या स्थानासाठी अधिक चिंतित दिसत आहेत. राष्ट्रवादीसमोर आता दोनच पर्याय आहेत. एकतर सर्व वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन सामूहिक नेतृत्वाची नवी रचना उभी करणे, किंवा घराणेशाहीच्या भोवऱ्यात अडकून आणखी कमकुवत होणे. कारण पक्ष केवळ एका कुटुंबाच्या नियंत्रणावर टिकत नाही; तो टिकतो कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि नेतृत्वाच्या सामर्थ्यावर.
सध्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी पाहता, पक्ष सत्तेच्या राजकारणात अडकून स्वतःची वैचारिक ओळख हरवत चालल्याचे स्पष्ट दिसते. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारा हा पक्ष आता स्वतःच्या घरातील संघर्षानेच हादरलेला आहे. आणि जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर राष्ट्रवादीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहण्यास फार वेळ लागणार नाही.

COMMENTS