ठाणे: ठाण्यातील एका निवासगृहात (लॉज) तरुणीचा उशीने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी तत्परतेने

ठाणे: ठाण्यातील एका निवासगृहात (लॉज) तरुणीचा उशीने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी प्रियकराला अवघ्या काही तासांत अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात संशयातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलीस सूत्रानुसार, संध्या म्हस्के (वय २३, रा. भांडुप) आणि नंदकिशोर गाडेकर (वय २७, रा. विष्णूनगर, डोंबिवली) यांची काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. हे दोघे ठाणे शहरातील एका लॉजवर आले होते. तेथे काही वेळाने दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वाद विकोपाला गेल्याने आरोपीने रागाच्या भरात उशीच्या सहाय्याने तरुणीचे तोंड दाबले. श्वास गुदमरल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने खोलीला बाहेरून कुलूप लावून तेथून पळ काढला. मात्र, तो एकटाच बाहेर पडल्याचे पाहून लॉजमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी खोलीची पाहणी केली असता तरुणी मृतावस्थेत आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच ठाणे शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर त्याला औपचारिक अटक करण्यात आली आहे.
संशयातून हत्या केल्याचा पोलिसांना संशय
प्राथमिक तपासात संशयावरून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. ठाणे शहर पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करत आहेत.

COMMENTS