Homeताज्या बातम्या

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड: नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे 'नीट' व इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आण

नांदेडमधील स्कूलबस किती सुरक्षित? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ तर सुरू नाही ना?
८० मोजा आणि पाणी प्या! किनवटमध्ये दुधाच्या दरवाढीसोबत भेसळीचा ’धंदा’ जोरात; अन्न व औषध प्रशासन कुंभकर्णी झोपेत?
किनवटजवळ चिखली शिवारात वीज कोसळून १५ वर्षीय बालकाचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

बीड: नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे ‘नीट’ व इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे प्रसिद्ध सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत बीड जिल्ह्यातील समस्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थी नेता शामीर खान यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या जिल्हाधिकार्‍यांमार्फत महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडे निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणे लोकशाही मूल्यांबाबत गंभीर चिंता निर्माण करणारे आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार दिला असून, विद्यार्थ्यांच्या हिताशी निगडित विषयांवर शासनाने दडपशाहीऐवजी सकारात्मक संवाद साधणे अपेक्षित आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज अधोरेखित करत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. भविष्यात विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्यासाठी अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाकडे ४ प्रमुख मागण्या मांडल्या: १. कथित पेपरफुटी व गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी व्हावी.

२. परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित व पारदर्शक करावी.

३. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान राखावा.

४. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र शासनाने आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधून मार्ग काढावा.

हे आंदोलन विद्यार्थी नेता शामीर खान यांच्या नेतृत्वाखाली अतिशय शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

COMMENTS