नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने NEET पेपर फुटीच्या कथित प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा कोर्टात उपस्थित करण्याचा एका वकिलाचा प्रय

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने NEET पेपर फुटीच्या कथित प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा कोर्टात उपस्थित करण्याचा एका वकिलाचा प्रयत्न फेटाळून लावला. भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी संबंधित वकिलाला कोर्टाचा वेळ वाया न घालवण्यास सांगितले आणि आंदोलनाचे व्हिडिओ पाहण्यास स्पष्ट नकार दिला.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर वकील म्हणाले, “जंतर-मंतरवर आधीच आंदोलन सुरू आहे. पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत.” त्यांनी असाही दावा केला की आंदोलकांवर अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. तुमचा वेळ आमच्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे.”
आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही
कोर्टाच्या भूमिकेनंतरही वकिलांनी आपले म्हणणे मांडणे सुरूच ठेवले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत, की सरकारने NEET परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि खुल्या वातावरणात घेतली पाहिजे तसेच NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) संस्था बरखास्त केली पाहिजे.”
खंडपीठात न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचाही समावेश होता. जेव्हा खंडपीठाने या विषयावर पुढे ऐकण्यास अनिच्छा दर्शवली, तेव्हा वकिलाने सांगितले की त्यांच्याकडे व्हिडिओंचा संग्रह आहे आणि परवानगी दिल्यास ते दाखवू शकतात. यावर सरन्यायाधीश म्हणाले, “आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही. आमच्याकडे ते पाहायला वेळ नाही.”
विशेष म्हणजे, याच वर्षाच्या सुरुवातीला सरन्यायाधीशांनी एका टिप्पणीत बेरोजगार तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ (cockroaches) केल्याचे समोर आले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ची स्थापना झाली, जी सध्या दिल्लीतील जंतर-मंतर येथील या आंदोलनाचा मुख्य चेहरा आहे.

COMMENTS