बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन (खगच्) यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जुलै 2026 रोजी वेठबिगारी व बालमजुरी या विषयावर क

बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन (खगच्) यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जुलै 2026 रोजी वेठबिगारी व बालमजुरी या विषयावर कामगारांसाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालमजूर व वेठबिगारांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणार्या ’उमंग’ ग्रुपचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. दिनेश पी. सुराणा यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी हरीष धार्मिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब सय्यद, इंटरनॅशनल जस्टिस मिशनचे प्रतिनिधी बिट्टो, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी सुदाम निर्मळ तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त उमेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात डॉ. वहाब सय्यद यांनी सांगितले की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या असंघटित कामगार विशेष सेलच्या माध्यमातून आतापर्यंत 118 वेठबिगार व बालमजुरांची सुटका करण्यात आली असून संबंधित मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुक्त झालेल्या व्यक्तींचे पुनर्वसन आणि बालकांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त प्रयत्नांतून बीड जिल्ह्यातून वेठबिगारी व बालमजुरीचे निर्मूलन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मा. दिनेश पी. सुराणा यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या 15100 या टोल-फ्री क्रमांकाची माहिती देत, अडचणीत असलेल्या नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन केले. तसेच वेठबिगारी व बालमजुरीच्या घटनांबाबत सर्वांनी सजग राहून अशा पीडितांच्या सुटकेसाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. बालकांचे पुनर्वसन व शिक्षण हे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ’उमंग’ ग्रुपचे उद्घाटन करण्यात आले. या ग्रुपच्या माध्यमातून बालमजूर आणि वेठबिगारांच्या पुनर्वसनासह त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी समन्वयाने काम केले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधीदूत तत्त्वशील कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व पीएलव्ही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधीक्षक एस. टी. शिंदे व त्यांच्या सहकारी कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS