बीड : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या उल्लेखनीय कार्याची नोंद करून घेणारे मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्

बीड : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या उल्लेखनीय कार्याची नोंद करून घेणारे मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व गीतकार अल्ताफ दादासाहेब शेख हे बीड येथे येणार आहेत. सा. ‘युवा लोकमित्र’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात त्यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक तथा संपादक ताहेर शेख आणि मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि बीड जिल्ह्याचे जावई असलेल्या अल्ताफ दादासाहेब शेख यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि सर्जनशीलतेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आतापर्यंत ‘वेडा बी.एफ.’ (मराठी), ‘कमॉन विष्णू’ (कन्नड), ‘धारावी कट्टा’ (हिंदी, कन्नड, तेलुगू), ‘कर्मयोगी आबासाहेब’ (मराठी, हिंदी) अशा विविध चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांच्या कार्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही घेण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी ‘लोरी’ (हिंदी) या चित्रपटासाठी गीतलेखन व संगीत निर्मितीचे कामही केले आहे. चित्रपटसृष्टीतील प्रवासात त्यांनी स्पॉट बॉयपासून सुरुवात करत प्रोडक्शन, कॉस्ट्यूम डिझाइन, आर्ट डायरेक्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रांत काम केले. कठोर परिश्रम आणि कलाक्षेत्रावरील निष्ठेच्या जोरावर त्यांनी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाला दिशा देणारे आणि सामाजिक संदेश देणारे चित्रपट निर्माण करणारे दिग्दर्शक म्हणून अल्ताफ शेख यांची मराठी, हिंदी तसेच इतर भाषांच्या चित्रपटसृष्टीत विशेष ओळख आहे. सा. ‘युवा लोकमित्र’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अल्ताफ शेख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या ‘कर्मयोगी आबासाहेब’ या मराठी-हिंदी चित्रपटात मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ यांना पत्रकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

COMMENTS