Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्राचे पहिले गैर काॅंग्रेसी मुख्यमंत्री !

महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने गैर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचेच नाव घ्यावे लागेल. अर्थात, त्यापूर्वी शरद पवार हे पुरोगामी लो

ऍड. बाळासाहेब, योग्यच म्हणाले!
सरकार पाडण्याचे उदात्तीकरण म्हणजे………! 
सीमाप्रश्न राजकारणाचे हत्यार नव्हे !

महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने गैर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचेच नाव घ्यावे लागेल. अर्थात, त्यापूर्वी शरद पवार हे पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद’च्या माध्यमातून मुख्यमंत्री बनले होते. परंतु, ते मुळतः काँग्रेसचे. मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्री होणे, हे महाराष्ट्रात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्याचं कारण, महात्मा गांधी यांच्या खुनानंतर देशभरात ब्राह्मण समुदायांवर हल्ले झाले होते आणि ग्रामीण भागातील हा समुदाय शहरांमध्येच  त्यावेळी आला. महाराष्ट्र सारखे राज्य हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे राज्य. या राज्यामध्ये या विचारांच्या विरोधातील राजकीय सत्ता येणे, हे तसे विरोधाभासी होते! परंतु, १९९५ ला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीच्या माध्यमातून ते शक्य झालं. शिवसेना ही तशी बहुजनांची संघटना. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर येणं म्हणजे एखाद्या ओबीसीला मुख्यमंत्रीपद मिळणं, असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटत होतं. परंतु, प्रत्यक्षात राजकीय सत्ता स्थापन करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा शिवसेनेमधील संघटक नेत्यांपेक्षा त्यातील मुत्सद्दी नेत्यांची सत्तास्थानी वर्णी लागली; आणि मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. शिवसेना या पक्षात मनोहर जोशी आणि तत्कालीन शिवसेनेतील एक नेते आणि आजचे राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री छगन भुजबळ हे पक्षांतर्गत एकमेकांचे त्यापूर्वी प्रतिस्पर्धी होते.  छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मनोहर जोशी हे देखील एक निमित्त होते. ज्याप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षात सत्ता येते, तेव्हा, त्या पक्षातील संघटक नेत्यांना दुय्यम स्थानी बसवण्याचा धोका मोठा असतो. याचे कारण दरबारी राजकारण करणारे नेते, हे पक्ष नेतृत्वाशी अधिक सलगी ठेवण्यात बुद्धिमान असतात. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द प्रमाण होता, असं म्हटलं जात असलं तरी, आतील दरबारी राजकारण करणाऱ्यांना नेहमीच मानाची पद आणि मोठी स्थान मिळत राहिली, हे देखील एक वास्तव होतं! शिवसेनेच्या दरबारी राजकारणात मनोहर जोशी हे मात्र एक मुत्सद्दी नाव होतं. त्यामुळेच शिवसेना फुटीचा जो पहिला फटका छगन भुजबळ यांच्या माध्यमातून पक्षाला मिळाला होता, त्याचे हे देखील एक कारण होते. तत्पूर्वी शिवसेनेत जेव्हा विरोधी पक्ष नेत्यांची संधी चालून आली, तेव्हा, छगन भुजबळ यांना डावण्यात आले. त्याचाही तो एक परिणाम होता. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळातच महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत गाजलेले रमाबाई हत्याकांड घडले. या हत्याकांडातील आरोपीचा अजूनही पूर्णपणे निर्णय लागलेला नाही. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय राबवले. त्यात झुणका भाकर केंद्र असतील, एसआर‌ए योजना असेल आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहन भत्ता असेल अशा अनेक निर्णयांना त्यांनी मार्गी लावले. परंतु, शिवसेनेला जेव्हा दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याचे वेध लागले, त्यावेळी ब्राह्मणेतर मुख्यमंत्री असावा, अशी एक शकल पक्षांतर्गत समोर आली असावी आणि त्यातून चार वर्षाच्या कार्यकाळानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशाने मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. ज्यावेळी गणपती दूध पिण्याचे प्रकरण देशभरात गाजले, त्यावेळी महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये देखील एक सांस्कृतिक विवाद उभा राहिला होता! ज्यामध्ये मनोहर जोशी म्हटले होते की, माझा घरचा गणपती दूध प्याला, तर गोपीनाथ मुंडे म्हणाले होते की, माझ्या घरचा गणपती दूध प्याल्याचे मी बघितले नाही! वरवर पाहता, हा दोन नेत्यांमधील एक वाक्यातील मत भिन्नता दर्शवतो. परंतु, प्रत्यक्षात या दोन नेत्यांमधील हा सांस्कृतिक संघर्ष होता. महाराष्ट्राच्या लक्षात हा संघर्ष फारसा आला नसला तरी, तत्कालीन या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एक जुगलबंदी निश्चितपणे राजकारणात होती, असा त्याचा अर्थ होतो. मनोहर जोशी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात त्यांची खाजगी तांत्रिक शिक्षण संस्था असलेली कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेचा विस्तार महाराष्ट्रात  केला त्यामुळे त्यांच्याविषयी पक्षांतर्गत पक्षश्रेष्ठींपर्यंत नाराजी पोहोचविण्यात आली होती. त्याचाही एक परिणाम त्यांचे मुख्यमंत्रीपद जाण्यात झाला होता. अर्थात, त्यांच्या या मुख्यमंत्री पदाच्या कार्याचा अनुभवाचा फायदा त्यांना पुढच्या राजकीय आयुष्यात निश्चित झाला. त्यामुळेच केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे नेतृत्वाखालील सरकार सत्तास्थानी असताना ते लोकसभेचे अध्यक्ष झाले होते.

COMMENTS