अकोले : शेतीमालाला हमीभाव, शेती कर्ज, पीकविमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, भारत-अमेरिका व्यापार कराराचे शेतीवरील पर

अकोले : शेतीमालाला हमीभाव, शेती कर्ज, पीकविमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, महिला शेतकऱ्यांचे प्रश्न, भारत-अमेरिका व्यापार कराराचे शेतीवरील परिणाम आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान समितीची दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक मुंबई येथे रविवारी (दि. २८) सुरू झाली. या बैठकीत देशव्यापी शेतकरी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मुंबईतील वाय. एम. सी. ए. आंतरराष्ट्रीय भवन येथे सुरू झालेल्या या बैठकीस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सरचिटणीस विजू कृष्णन, उपाध्यक्ष आमरा राम, माजी खासदार हनन मोला, पी. कृष्णप्रसाद, त्रिपुरातील विरोधी पक्षनेते जितेंद्र चौधरी, बिहारचे आमदार अजय कुमार यांच्यासह २६ राज्यांतील ७० हून अधिक शेतकरी नेते उपस्थित आहेत.
बैठकीत रासायनिक खतांचा तुटवडा, संभाव्य दुष्काळ, खरीप हंगामावरील संकट, शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाचे वाढते प्रमाण, शेतीमालाच्या घसरत्या किमती, हमीभावाचा प्रश्न, पीकविमा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती तसेच देशातील अन्नसुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भारत-अमेरिका, भारत-युरोप आणि भारत-न्यूझीलंड यांच्यातील व्यापार करारांचा भारतीय शेतीवर होणारा परिणाम, तांदळापासून इथेनॉल निर्मितीला दिलेली परवानगी, तसेच ऊस नियंत्रण आदेशातील बदलांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचाही बैठकीत ऊहापोह झाला.
बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाले. या बैठकीतून शेतकरी आंदोलनाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS