Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये ‘जवाब दो महामोर्चा’; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नांदेड: जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांमधील कथित अनियमितता, सामाजिक पेन्शन वितरणातील विलंब, वृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न तसेच नागरी सुविधां

विजेच्या खेळखंडोब्यामुळे बेलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणच्या गलथान कारभारावर ग्रामस्थ संतप्त
घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू; खा. बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप
महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नांदेड: जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांमधील कथित अनियमितता, सामाजिक पेन्शन वितरणातील विलंब, वृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न तसेच नागरी सुविधांबाबतच्या विविध मागण्यांसाठी ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशन सपोर्ट युवा टास्क फोर्स’ आणि ‘बहुजन टायगर सेना’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी नांदेड येथे ‘जवाब दो महामोर्चा’ काढण्यात आला.

रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तेथे सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संघटनेचे मुख्य मार्गदर्शक राजेश्वर हातीआंबेरे पालमकर यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. अधिकारी हे जनतेचे लोकसेवक असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अधिक तत्परतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून वाहतुकीसाठी रस्ते रुंद करण्याची, आयटीआय मैदानावर संविधान स्तंभ उभारण्यासह वन व गायरान जमिनीवरील धारकांना मालकी हक्क देण्याची मागणी त्यांनी केली.

बहुजन टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माधव दादा जमदाडे यांनी वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधन वितरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पात्र कलावंतांना तातडीने मानधन देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनांतील लाभार्थ्यांच्या पेन्शनचे वितरण नियमित व वेळेत व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय नांदेड महानगरपालिकेतील कचरा व्यवस्थापन आणि अमृत योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

मोर्चाच्या शेवटी शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना १६ कलमी निवेदन सादर केले. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी भत्ता योजना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व स्वाधार योजनांचे लाभ तातडीने देणे, तसेच विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषध उपलब्धतेचा प्रश्न सोडविणे आदी मागण्यांचा समावेश होता. संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाने मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून संबंधित विभागांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी केली. निर्धारित कालावधीत समाधानकारक निर्णय न झाल्यास पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढून व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

COMMENTS