कोपरगाव : "योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य परंपरा असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. आधुनिक जीवनशैलीमुळ

कोपरगाव : “योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य परंपरा असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारे ताणतणाव आणि मानसिक अस्थिरता यांवर योग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे,” असे प्रतिपादन योगगुरू अभिजित शहा यांनी केले.
कोपरगाव नगरपालिका व समता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साईसिटी, भामनगर येथील ‘समता योग भवन व आरोग्य मंदिर’ येथे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित योगसाधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश गुजराथी यांनी केले. त्यानंतर योगगुरू अभिजित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित ७५ पेक्षा जास्त महिला व पुरुष योगसाधकांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी नाजुका गव्हाळे यांनी पतंजली श्लोक, गायत्री मंत्र आणि मराठी लोकगीतांवर आधारित योग सादरीकरण महिला योगसाधकांकडून करून घेतले. वसुदेव साळुंके व राघव साळुंके यांनीही उत्कृष्ट योगप्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. नंदकुमार जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, तर संगीता देवकर यांनी स्वलिखित योग कविता सादर करून आरोग्याचा प्रभावी संदेश दिला.
या कार्यक्रमास समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उत्तमभाई शहा, जेठाभाई पटेल, सुहासिनी कोयटे, किरण देशमुख, मंदा घनघाव, राजेंद्र जगताप, बाळासाहेब शेंडगे, बोरनारे, राजेंद्र वरखडे यांच्यासह कोपरगाव शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS