नवी दिल्ली : देशातील वाढत्या उष्णतेचा तसेच मान्सूनपूर्व हवामानातील बदलांचा विचार करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी आयपीएल हंगामांचे वेळापत्रक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या उष्णतेचा तसेच मान्सूनपूर्व हवामानातील बदलांचा विचार करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी आयपीएल हंगामांचे वेळापत्रक बदलण्याच्या तयारीत आहे. खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सोयीला प्राधान्य देत आयपीएल 2027 ची स्पर्धा नेहमीपेक्षा काही आठवडे आधी सुरू करण्याचा गंभीर विचार सुरू असल्याची माहिती मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
सध्या आयपीएल स्पर्धा साधारणपणे मार्चच्या अखेरीस सुरू होऊन मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालते. मात्र, मे महिन्याच्या उत्तरार्धात देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढते. याशिवाय काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसामुळे सामन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर भविष्यातील हंगाम 10 मार्च ते 15 मे या कालावधीत पूर्ण करण्याचा आराखडा तयार केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. मंडळाचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, स्पर्धेचे वेळापत्रक अधिक अनुकूल कसे करता येईल यावर सातत्याने विचारविनिमय सुरू आहे. त्यानुसार मार्चच्या सुरुवातीपासून स्पर्धेला प्रारंभ करून मे महिन्याच्या मध्यापर्यंत संपूर्ण हंगाम पूर्ण करण्याची शक्यता तपासली जात आहे. मे महिन्याच्या अखेरीस अनेक शहरांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. दीर्घकाळ मैदानावर खेळणार्या क्रिकेटपटूंवर त्याचा शारीरिक परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्टेडियममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून सामने पाहणार्या हजारो प्रेक्षकांनाही उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे स्पर्धा लवकर संपवण्याचा पर्याय अधिक व्यवहार्य मानला जात आहे. याशिवाय मे महिन्याच्या उत्तरार्धात काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. अचानक होणार्या पावसामुळे सामने खंडित होण्याची किंवा वेळापत्रक बिघडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हवामानाशी संबंधित अडचणी टाळण्यासाठीही हा बदल उपयुक्त ठरू शकतो.

COMMENTS