Homeताज्या बातम्या

शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान

मुंबई : सलग पाच व्यवहार सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला शुक्रवारी अचानक ब्रेक लागला. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय भांडवली बाजारात मोठी पडझड

महागाईचा भडका उडणार? सावधान! लवकरच महागणार पेट्रोल-डिझेल
महागाई वाढण्याचे रिझर्व्ह बँकेचे संकेतरेपो दर कायम, विकासदराचा अंदाज घटला
ट्रम्पच्या नेतृत्वाखाली भयगंड महासत्ता!


मुंबई : सलग पाच व्यवहार सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला शुक्रवारी अचानक ब्रेक लागला. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. प्रमुख निर्देशांकांमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांवर सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला. परिणामी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली.
दिवसभरातील व्यवहारांमध्ये मुंबई शेअर निर्देशांक तब्बल 833 अंकांनी घसरून 76,576.89 अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर निर्देशांक 229 अंकांनी खाली येत 23,938.75 अंकांवर स्थिरावला. गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार वाढीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याने बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आजच्या घसरणीत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले. या क्षेत्राशी संबंधित निर्देशांकात सुमारे सहा टक्क्यांची घसरण झाली. जागतिक स्तरावरील मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर या क्षेत्रातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यामुळे अनेक प्रमुख माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी पडझड झाली. काही अग्रगण्य कंपन्यांचे समभाग पाच ते आठ टक्क्यांपर्यंत घसरल्याने संपूर्ण क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कमकुवत कामगिरीमुळे बाजारातील एकूण वातावरणही नकारात्मक बनले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात निधी काढून घेतल्याचाही परिणाम बाजारावर झाला. गुरुवारी त्यांनी सुमारे 10 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम बाजारातून बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. याआधी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारात सलग पाच सत्रे तेजीचे वातावरण होते. या कालावधीत प्रमुख निर्देशांकांनी हजारो अंकांची उसळी घेतली होती. मात्र, मोठ्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी नफा सुरक्षित करण्यासाठी विक्रीचा मार्ग स्वीकारल्याने बाजार घसरला. आशियातील अनेक प्रमुख बाजारपेठांमध्येही घसरणीचे वातावरण दिसून आले. काही महत्त्वाच्या आशियाई निर्देशांकांमध्ये एक ते दीड टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. अमेरिकन बाजारातही कमकुवतपणा दिसून आल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. याउलट युरोपीय बाजारांमध्ये काही प्रमाणात सकारात्मक वातावरण दिसून आले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदारांना फटका
आजच्या घसरणीमुळे विशेषतः माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला. बाजार उघडल्यानंतर काही तासांतच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे दोन लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले. त्यामुळे अल्पकालीन तेजीवर विश्‍वास ठेवणार्‍या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. बाजारातील आगामी दिशा जागतिक आर्थिक घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांचा कल आणि कंपन्यांच्या तिमाही कामगिरीवर अवलंबून राहणार असल्याचे बाजार विश्‍लेषकांचे मत आहे.

COMMENTS