अहिल्यानगर : शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना अशोक खरात यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या और

अहिल्यानगर : शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना अशोक खरात यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा धक्का दिला आहे. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणाचा सखोल तपास आणि पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रकरणातील तक्रारदाराने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी आरोपींकडून सुमारे तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जावर दरमहा दोन टक्के व्याज आकारण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. कर्जाच्या हमीपोटी तक्रारदाराच्या मालकीची शेती कल्पना खरात यांच्या नावावर खरेदीखताद्वारे हस्तांतरित करण्यात आली होती. घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाची संपूर्ण रक्कम परत केल्यानंतरही संबंधित जमीन पुन्हा तक्रारदाराच्या नावावर करण्यात आली नाही, असा आरोप आहे. वारंवार पाठपुरावा करूनही जमीन परत करण्यास नकार दिल्याने आपली आर्थिक व मालमत्तेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली.
अटक टाळण्यासाठी कल्पना खरात यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या आर्थिक व्यवहारात आपला कोणताही थेट सहभाग नसून, मुख्य आरोपीची पत्नी असल्यामुळेच आपल्याला या गुन्ह्यात विनाकारण गोवण्यात आल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला होता. मात्र, सरकारी पक्षाने या दाव्याला तीव्र विरोध करत तपासात समोर आलेले विविध पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यामध्ये जमिनीच्या खरेदीखतावरील कल्पना खरात यांच्या स्वाक्षऱ्या आणि त्यांच्या बँक खात्यातील व्यवहारांच्या नोंदींचा समावेश होता. या कागदपत्रांवरून संबंधित व्यवहारांची त्यांना पूर्ण माहिती होती आणि त्यात त्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला, जो न्यायालयाने ग्राह्य धरला.

COMMENTS