कोलकाता : पश्चिम बंगालमधील नगरपालिका भरती प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेच्या तपासाला वेग आला असून, अंमलबजावणी संचालनालय अर्थात 'ईडी'ने (ED) क
कोलकाता : पश्चिम बंगालमधील नगरपालिका भरती प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेच्या तपासाला वेग आला असून, अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’ने (ED) कोलकाता आणि परिसरातील विविध ठिकाणांवर एकाच वेळी शोधमोहीम राबवली. या धडक कारवाईत कामारहाटी मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांचाही समावेश होता.
ईडी अधिकार्यांच्या पथकांनी मदन मित्रा यांच्या भवानीपूर आणि कालीघाट येथील निवासस्थानी तपास सुरू केला. नगरपालिका भरती प्रक्रियेतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कामारहाटी नगरपालिकेतील काही नियुक्त्यांबाबत माहिती व कागदपत्रे गोळा करण्यासाठी ही शोधमोहीम राबवण्यात आली. याच तपासाचा भाग म्हणून बेहला परिसरातही स्वतंत्र पथकाने चौकशी केली. या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, या कारवाईच्या अवघ्या एक दिवस आधीच मदन मित्रा यांनी कामारहाटी नगरपालिकेचे अध्यक्ष गोपाल साहा यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून अध्यक्षांवर दबाव आणण्यात आल्यानाचा आरोप त्यांनी केला होता, तसेच नगरसेवकांनी सामूहिक राजीनाम्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. मित्रा यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि नगरसेवकांना आंदोलनासाठी पुढे येण्याचे आवाहन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला पुन्हा यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे.
पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विविध वाद, नगरसेवकांवरील आरोप आणि अटकेच्या सत्राच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका भरती प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. या प्रकरणात मदन मित्रा यांचे नाव समोर आल्याने तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी करत असून, पुढील चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS