Homeताज्या बातम्या

ड्रोनद्वारे टपाल वितरणाची यशस्वी चाचणी; हिमाचल प्रदेशातील मंडीचे टपाल कार्यालय देशातील पहिले ठरले

मंडी : हिमाचल प्रदेशातील डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये टपाल सेवा अधिक वेगवान व प्रभावी करण्याच्या दिशेने भारतीय टपाल विभागाने महत्त्वाचे पाऊल टाक

इबोला संसर्गामुळे केंद्र सरकार सतर्क; काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळण्याचे आवाहन
मुंबईत सीएनजीच्या दरात पुन्हा २ रुपयांची वाढ; १५ दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ, पीएनजीही ५० पैशांनी महागला
CBSE उत्तरपत्रिका मूल्यांकनावर खा. राहुल गांधींचे प्रश्नचिन्ह; मंडळाने सर्व आरोप फेटाळले

मंडी : हिमाचल प्रदेशातील डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये टपाल सेवा अधिक वेगवान व प्रभावी करण्याच्या दिशेने भारतीय टपाल विभागाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मंडी येथे ड्रोनच्या माध्यमातून टपाल वितरणाची यशस्वी चाचणी पार पडली असून, अशा प्रकारचा प्रयोग करणारे मंडीचे मुख्य टपाल कार्यालय देशातील पहिले ठरले आहे. या यशस्वी प्रयोगामुळे भविष्यात दुर्गम भागांपर्यंत टपाल आणि पार्सल सेवा अत्यंत कमी वेळेत पोहोचवणे शक्य होणार असल्याचे मानले जात आहे.

भारतीय टपाल विभागाने प्रायोगिक तत्वावर ही चाचणी मंडी मुख्य टपाल कार्यालयापासून रेहदार शाखा कार्यालयापर्यंत घेतली. सुमारे १२ किलोमीटर अंतर असलेल्या डोंगराळ मार्गावर ड्रोनने अवघ्या ९ ते १० मिनिटांत टपाल पोहोचवले. याच मार्गावर पारंपरिक पद्धतीने टपाल वितरण करण्यासाठी अनेक तास, तर काही वेळा पूर्ण दिवस खर्ची पडत असल्याने हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक गावे डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली आहेत. खराब हवामान, अवघड रस्ते आणि वाहतुकीच्या मर्यादित सुविधा यामुळे अशा भागांमध्ये टपाल पोहोचवणे मोठे आव्हान ठरते. या पार्श्वभूमीवर ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वेळेची बचत होण्याबरोबरच नागरिकांना जलद सेवा देणे शक्य होणार आहे.

मंडी मुख्य टपाल कार्यालयाच्या प्रमुख नेहा सांख्यान यांनी सांगितले की, बदलत्या तांत्रिक युगात आधुनिक साधनांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. भारतीय टपाल विभागाने एका तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला असून, भविष्यात टपाल वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. पूर्वी दिवसभर लागणारे काम आता अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंडी विभागाचे उपअधीक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही ड्रोनने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चाचणीचे निष्कर्ष अत्यंत समाधानकारक असून, भविष्यात टपाल सेवांच्या विस्तारासाठी हा प्रयोग दिशादर्शक ठरू शकतो. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत अत्यावश्यक कागदपत्रे, पार्सल आणि अन्य साहित्य जलद गतीने पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वेळ, मनुष्यबळ आणि खर्चाची होणार बचत

देशात डिजिटल सुविधांचा विस्तार आणि सेवा व्यवस्थेचे आधुनिकीकरण यावर भर दिला जात असताना मंडी येथे झालेला हा प्रयोग महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ड्रोनच्या साहाय्याने टपाल वितरण केल्यास वेळ, मनुष्यबळ आणि खर्च यांची बचत होण्यास मदत होईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक कागदपत्रे किंवा साहित्य जलदगतीने पोहोचवणेही शक्य होणार आहे. मंडी येथे यशस्वी झालेला हा प्रयोग भविष्यात देशभरातील टपाल सेवांसाठी नवे मॉडेल ठरू शकतो. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक, जलद आणि विश्वासार्ह टपाल सेवा उपलब्ध करून देण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

COMMENTS