मुंबई : विनोदी कार्यक्रमांतील कथित आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या विनोदकार प्रणित मोरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत

मुंबई : विनोदी कार्यक्रमांतील कथित आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या विनोदकार प्रणित मोरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोरे यांच्या आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व व्हिडिओची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे चौकशीची व्याप्ती केवळ काही चर्चित दृश्यफितींपुरती मर्यादित न राहता संपूर्ण आशयापर्यंत पोहोचणार आहे.
गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यासंदर्भात माहिती देताना समाजात विकृत स्वरूपाचा विनोद स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राज्याच्या सायबर यंत्रणेमार्फत संबंधित सर्व दृश्यफितींची छाननी केली जाईल आणि कायद्याचे उल्लंघन आढळल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. अलीकडे समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या काही कार्यक्रमांच्या दृश्यफितींमुळे हा वाद निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीने मृतदेहांबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच अन्य एका कथनावरूनही विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चौकशीला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गृह विभागाच्या मते, देहदान करणार्या व्यक्ती किंवा मृतदेहांविषयी असंवेदनशील टिप्पणी करणे समाजमान्य नसून अशा प्रकरणांत कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते. या चौकशीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ वादग्रस्त ठरलेल्या दोन-तीन दृश्यफितींचीच नव्हे, तर मोरे यांच्या पूर्वीच्या कार्यक्रमांमधील तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या सर्व आशयाची तपासणी होणार आहे.
अखेर प्रणित मोरेचा जाहीर माफीनामा
सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका वादग्रस्त विनोदी कार्यक्रमाच्या चित्रफितीमुळे चर्चेत आलेल्या विनोदी कलाकार प्रणित मोरे यांनी अखेर सार्वजनिकरीत्या माफी मागितली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे आणि कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रसंगामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याची कबुली देत त्यांनी स्वतःवरील टीका योग्य असल्याचे मान्य केले. कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने काही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधाने केली होती. त्या वेळी त्याला तात्काळ रोखण्यात आपण अपयशी ठरलो, ही चूक आपलीच असल्याचे त्यांनी मान्य केले.

COMMENTS