पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. श्री विठ्ठल मूर्

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. श्री विठ्ठल मूर्तीच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या विशेष लेपन प्रक्रियेमुळे आगामी २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या दोन दिवसांत भाविकांनी पंढरपूरला येण्याचे नियोजन टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंदिरातील श्री विठ्ठल मूर्तीवर कालांतराने नैसर्गिक झीज होत असल्याचे निरीक्षण समोर आले होते. मूर्तीच्या पायाजवळ काही भाग झिजल्याचे तसेच इतर काही ठिकाणी सूक्ष्म नुकसान झाल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी रासायनिक लेपन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी प्रतिनिधी, पुरातत्त्व विभाग आणि तज्ज्ञांची बैठक झाली होती. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार रासायनिक पद्धतीने संवर्धन करण्याचे ठरले.
२२ ते २४ जून या कालावधीत ही प्रक्रिया पार पडणार असून, मूर्तीच्या झिजलेल्या भागांवर त्याच प्रकारच्या दगडाची भुकटी आणि सेंद्रिय घटकांच्या मिश्रणाचा वापर करून संरक्षणात्मक थर दिला जाणार आहे. यामुळे मूर्तीतील सूक्ष्म भेगा आणि झिजलेल्या भागांची दुरुस्ती होण्यास मदत होणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाईल. मूर्तीचे पावित्र्य तसेच संरक्षण अबाधित राहावे यासाठी २३ व २४ जून रोजी मंदिर बंद राहील. यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या वर्षांतही श्री विठ्ठल मूर्तीचे अशाच प्रकारे संवर्धन करण्यात आले होते.

COMMENTS