Homeताज्या बातम्या

संगमनेरकर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी; अन्न व औषध प्रशासनातून बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

संगमनेर : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, गुटखा आणि आरोग्याला घातक असणाऱ्या पदार्थ

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईला हायकोर्टाचा झटका; ८ दूध डेअरींच्या निलंबनाला अंतरिम स्थगिती
एफडीएची थेट बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड; प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मचा परवानाही निलंबित! तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई
तुकाराम मुंडे नांदेडला आल्याच्या अफवेने खळबळ; कारवाईच्या भीतीने शहरातील पानटपऱ्या बंद, गुटखा विक्रेत्यांचा पोबारा

संगमनेर : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, गुटखा आणि आरोग्याला घातक असणाऱ्या पदार्थांविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईचे संगमनेरकर नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या अधिकाऱ्याची अन्न व औषध प्रशासन विभागातून कोणतीही बदली करू नये, अशी आग्रही मागणी संगमनेरमधील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संगमनेरमधील विविध सामाजिक, व्यापारी व नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केलेले हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून अन्नपदार्थांमधील भेसळ, बनावट साहित्याचा वापर आणि बोगस औषधांचा प्रश्न गंभीर बनला होता. यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून मधुमेह, काविळ, टायफॉईड, कर्करोग (कॅन्सर) यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या मते, यापूर्वी अनेक तक्रारी होऊनही कोणतीही प्रभावी कारवाई होत नव्हती.

मात्र, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भेसळखोर, बनावट औषध विक्रेते आणि गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून आरोग्यविषयक धोके कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही कारवाई अखंडितपणे सुरू राहिल्यास बेकायदेशीर व्यवसायांना मोठा आळा बसेल, ज्याचा थेट फायदा नागरिकांच्या आरोग्याला होईल.

दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्यास संगमनेरमधील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. त्यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या कारवाया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने त्यांना पूर्ण पाठबळ द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

COMMENTS