गुवाहाटी : आसाममधील कथित पासपोर्ट वाद प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुवाहा

गुवाहाटी : आसाममधील कथित पासपोर्ट वाद प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुवाहाटी येथील गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून 23 मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हे प्रकरण आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुईयान सरमा यांच्या कथित परदेशी पासपोर्ट आणि मालमत्तेशी संबंधित आरोपांभोवती फिरत आहे. या संदर्भात विविध आरोपांची चौकशी सुरू असून गुन्हे शाखेकडून तपास वेगाने पुढे नेला जात आहे. यापूर्वी काँग्रेस नेते पवन खेरा यांनाही या प्रकरणात समन्स बजावण्यात आले होते. एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत खेरा यांनी रिनिकी भुईयान सरमा यांच्याकडे भारताबरोबरच संयुक्त अरब अमिरात, इजिप्त आणि अँटिग्वा या देशांचे पासपोर्ट असल्याचा आरोप केला होता. तसेच सरमा कुटुंबाने परदेशात अघोषित मालमत्ता ठेवल्याचाही दावा त्यांनी केला होता. या आरोपांनंतर रिनिकी भुईयान सरमा यांनी गुवाहाटी गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. त्यामध्ये फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिशाभूल करणारी विधाने करणे आणि बदनामी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अटींनुसार पवन खेरा यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ते 13 मे रोजी गुवाहाटी गुन्हे शाखेसमोर हजर झाले. पहिल्या दिवशी त्यांची दहा तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर 14 मे रोजीही त्यांची सुमारे आठ तास चौकशी झाली.

COMMENTS