खरवंडी कासार : खरवंडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची स्थापना करावी तसेच खरवंडी दुरक्षेत्रात दीर्घकाळ कार्

खरवंडी कासार : खरवंडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची स्थापना करावी तसेच खरवंडी दुरक्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी किसन आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खरवंडी हे पाथर्डी तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. परिसरात भगवानगड हे प्रसिद्ध देवस्थान असून राज्यासह परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ आणि पैठण-पंढरपूर पालखी मार्ग या भागातून जात असल्याने वाहतुकीची मोठी वर्दळ असते.
अशा परिस्थितीत परिसरात चोरी, दरोडे, रस्तालूट, दहशत निर्माण करणे आदी घटनांमध्ये वाढ होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
या भागात स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित असून ती तातडीने मंजूर करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. तसेच परिसरात कायमस्वरूपी अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ आणि वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
अलीकडे परिसरातील काही गावांमध्ये झालेल्या दरोड्यांतील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांबाबत कारवाई न झाल्यास खरवंडी परिसरातील नागरिकांच्या वतीने १२ जून २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

COMMENTS