Homeताज्या बातम्या

खंडित वीजपुरवठ्यामुळे तरोडावासीय हैराण; नागरिकांचा संताप वाढला

नांदेड : तरोडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गही मोठ्या अडचणीत सापडला आहे. द

कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीकराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
मेफेड्रोन कारखाना उभारण्याच्या तयारीतील तिघे अटकेतकुरकुंभ प्रकरणातील आरोपीकडून मार्गदर्शन घेतल्याचा दावा
Electricity bill recovery drive : महावितरणचा वीज बिल थकबाकीदारांना दणका


नांदेड : तरोडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गही मोठ्या अडचणीत सापडला आहे. दररोज होणार्‍या अनियमित लोडशेडिंगमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, वीज कधी जाईल आणि कधी येईल याबाबत कोणतेही निश्चित वेळापत्रक नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या संबंधित अभियंत्यांशी अथवा तांत्रिक कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा फोन उचलला जात नाही. त्यामुळे नेमकी समस्या काय आहे आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होणार याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढत आहे. तरोडा परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नवीन वसाहती, अपार्टमेंट्स आणि फ्लॅट संस्कृतीचा विस्तार झाला आहे. परिणामी विजेची मागणी आणि भारही लक्षणीय वाढला आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महावितरणने आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः मागील पाच ते सहा वर्षांत वाढलेल्या वीजभाराचा विचार करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, जुन्या यंत्रणांचे आधुनिकीकरण करणे आणि वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे अपेक्षित होते. परंतु या उपाययोजना वेळेत न झाल्याने ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम वारंवार होणार्‍या वीजखंडितीवर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुपारच्या तसेच रात्रीच्या वेळेत अनेक भागांमध्ये वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्याने घरगुती कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास, लघुउद्योग तसेच व्यापारी व्यवहारांवर विपरीत परिणाम होत आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत आणि नागरिकांच्या तक्रारींना तत्पर प्रतिसाद देण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अन्यथा वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS