धुळे : धुळे जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात दोन दुहेरी हत्याकां

धुळे : धुळे जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात दोन दुहेरी हत्याकांड घडल्याने संपूर्ण धुळे जिल्हा भीतीच्या छायेत ढकलला गेला आहे. शिरपूरमधील घटना ताजी असतानाच, आता साक्री तालुक्यात भोंदूगिरीच्या नादातून एका तरुण आणि तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
साक्री तालुक्यातील वर्धाने-उभरांडी शिवारात हा रक्तरंजित खेळ खेळला गेला. २५ वर्षांची जयश्री काकुस्ते आणि २८ वर्षांचा अक्षय सोनवणे हे दोघे आपल्या कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी एका तथाकथित बाबाकडे गेले होते. स्वतःला भविष्य सांगणारा भगत म्हणवून घेणारा संशयित योगेश उर्फ भैय्या खैरनार याच्या मठात हे दोघे पोहोचले. मात्र, हा मठ त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला.
पोलिस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मठात झालेल्या वादाच्या भरात संशयित भैय्या खैरनार याने आधी अक्षयच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याची हत्या केली. हा गुन्हा लपवण्यासाठी आणि कोणतीही साक्षीदार उरू नये म्हणून, त्याने सोबत असलेल्या जयश्रीची गळा दाबून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्याने जयश्रीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून त्यावर दुचाकी टाकली, जेणेकरून हा अपघात वाटावा. तर अक्षयचा मृतदेह एका निर्जन टेकडीवर नेऊन पुरला. मात्र, धुळे पोलिसांनी मोबाईल लोकेशन, घटनास्थळावरील धागेदोरे आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने अवघ्या काही तासांतच या नराधम भोंदू बाबाला जेरबंद केले आहे.
नाशिकचा खरात बाबा असो किंवा साक्रीचा हा भोंदू भगत, लोकांच्या अगतिकतेचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेत आज माणसांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. ही घटना समाजासाठी एक मोठा आणि कडक इशारा आहे. त्यामुळेच आम्हीही तुम्हाला आवाहन करतो- अंधश्रद्धेला बळी पडू नका, जागरूक राहा, सावध राहा आणि अशा भोंदूगिरीला ठामपणे नकार द्या!

COMMENTS