घराणेशाहीला सर्वच पक्षांकडून उत्तेजन

Homeताज्या बातम्यासंपादकीय

घराणेशाहीला सर्वच पक्षांकडून उत्तेजन

राजकीय घराणेशाही किमान भाजप तरी मोडीत काढेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही राजकीय घराणेच भाजप आपल्या कळपात ओढून पुन्हा घराणेशाहीला उत्तेजनच देतांना दिसू

राज्यात पुन्हा राजकीय धुरळा
शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक लढयाला बळ !
अवकाळी आणि तापमानवाढ

राजकीय घराणेशाही किमान भाजप तरी मोडीत काढेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही राजकीय घराणेच भाजप आपल्या कळपात ओढून पुन्हा घराणेशाहीला उत्तेजनच देतांना दिसून येत आहे. त्यामुळे भारतात संस्थानिक गेले असले, तरी राजकीय घराणेशाही चांंगलीच फोफावली आहे. आणि घराणेशाहीला लगाम फक्त मतदारराजाच घालू शकतो. मात्र लोकशाहीची मूल्ये भारतात अजूनही रुजली नसल्यामुळे, मतदार राजा सजग व्हायला तयार नाही. त्याला आपल्या हक्कांची अजूनही जाणीव झालेली नाही. त्यामुळे तो आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना कधी प्रश्‍न विचारत नाही. रस्ता चांगला नसेल, तर तो त्याच खड्डयावरून मार्गक्रमण करीत राहतो. आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार नसेल तरी तो मुकाटयाने आपल्या नशीबाला दोष देत राहतो. मात्र तो राज्यकर्त्यांना जाब विचारत नाही, कारण त्याला लोकशाहीचे मूल्य अजूनही कळलेले नाही. त्यामुळे लोकशाहीची मूल्ये रूजवण्याची खरी गरज आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणांचा पोत बघता, सत्ता ही काही विशिष्ट घराण्याभोवती पाणी भरतांना दिसून येत आहे. आलटून-पालटून सत्ता भोगत, आज हा पक्ष, तर उद्या तो पक्ष जवळ करत, सत्ता फक्त आपल्याभोवतीच केंद्रीच करण्याचा डाव या घराणेशाहीच्या राजकारणांतून दिसून येतो. समाजाचे भलेबुरे करणारे आपणच तारणहार आहोत, अशी समाजाची मानसिकता कार्यकर्त्यांची करत, ती समाजात बिंबवण्यात ही घराणे यशस्वी ठरतांना दिसत आहे. त्यामुळे गाव, गल्ली, शहर, वार्डाचा विकास झाला नाही, तरी भैय्या, काका, अण्णा, दादा, भाऊ नावाची हाळी देत कार्यकर्ते आपल्याभोवती झुलवत ठेवण्यात ही घराणे यशस्वी झाली असली, तरी यातून अनेक पिढया उद्धवस्त झाल्या आहेत. ना रोजगार, ना मूलभूत सोयी-सुविधांचा विकास तरी, आपला नेत्यांवर कुणी टीका केली, तर त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता कुठून येते, आणि कशी तयार केली जाते, हा यक्षप्रश्‍नच म्हणावा लागेल. ही घराणी समाजाला गृहीत धरूनच आपल्या भूमिका त्यावर लादतात. आपला वारसदार समाजाने नेता म्हणून स्वीकारलाच पाहिजे अशी व्यवस्था ही घराणी करतात. सत्तेच्या राजकारणासाठी असणार्‍या वयाची अट पूर्ण करण्यापूर्वीच वारसदाराला ‘लाँच’ केले जाते. कुठल्याही सामाजिक-राजकीय प्रश्‍नाला भिडण्यापूर्वी आमदारकी मिळणार्‍या वारसदाराचा रुबाब आपोआपच वाढतो. राज्यकारभाराची जबाबदारी पार पाडण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत, असे मानूनच ही घराणी सत्ता राबवताना दिसतात. सत्तेतील राजकारणाचा इतरांचा वाटा हा आपण ठरवून देऊ तेवढाच आहे, आपल्या मागच्या पिढीने समाजासाठी अद्वितीय काम केलेले असल्याने सत्तेच्या संधी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना आहेत, या मानसिकतेतच ही घराणी वावरतात. अर्थातच हे सर्वच घराण्यांना लागू होते असे नाही. काही घराण्यांच्या पहिल्या पिढीने चांगले काम केले आहे, तर काहींच्या दुसर्‍या पिढीने चांगले काम केलेले आहे. मात्र, एकंदर संसदीय लोकशाही राजकारणाच्या चौकटीत अशा घराण्यांची मानसिकता संकुचित स्वरूपाचीच पाहावयास मिळते. राजकीय घराण्यांचे प्राबल्य टिकून ठेवण्यास आपला समाजही तितकाच जबाबदार आहे. निवडणुकांच्या माध्यमातून त्याच त्या लोकांना निवडून देण्याचे काम समाजच करत असतो. याचं कारण आपला समाज व्यक्तिपूजक आहे. सामाजिक विकासाचे व्यापक हित साधणार्‍या नेत्यापेक्षा मुलाला नोकरी देणारा, शेतीला कर्ज देणारा, घरच्या लग्न- समारंभात उपस्थित राहणारा नेता वा त्याचा वारसदार लोकांना आपलासा वाटतो. याशिवाय आपला नेता चतुर, देखणा, चाणाक्ष आणि आथकदृष्टया प्रबळ असावा अशीही समाजाची अपेक्षा असते. यातूनच घराणेशाहीची मान्यता ठसठशीत होत जाते.
क्रमशः

COMMENTS