पुणे : नाशिक व संभाजीनगरमधील शासकीय वाहन भाडे करारांमध्ये मोठ्या प्रमाणावर दरांमध्ये तफावत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे प्रश

पुणे : नाशिक व संभाजीनगरमधील शासकीय वाहन भाडे करारांमध्ये मोठ्या प्रमाणावर दरांमध्ये तफावत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोशल मीडियावर केलेल्या खुलाशांमुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे.
कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आठ तासांच्या करारावर घेतल्या जाणार्या वाहनाचे भाडे सुमारे 1620 रुपये आहे. मात्र, त्याच प्रकारच्या वाहनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल 3000 रुपये आकारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 12 तासांच्या करारासाठी नाशिकमध्ये सुमारे 2520 रुपये मोजावे लागतात, तर संभाजीनगरमध्ये हेच भाडे 5300 रुपयांपर्यंत पोहोचते. या फरकाचे नेमके कारण काय, असा थेट सवाल कुंभार यांनी उपस्थित केला आहे. फॉर्च्युनरसारख्या उच्च दर्जाच्या वाहनांच्या भाड्यांमध्येही मोठी विसंगती असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी आठ ते अकरा तासांसाठी 3000 ते 3500 रुपये दर असताना, दुसर्या ठिकाणी हेच दर 7000 ते 11,000 रुपयांपर्यंत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बाजारभावाच्या तुलनेत हे दर अधिक असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कुंभार यांनी ‘दर करार’ ही शासन व्यवस्थेतील महत्त्वाची पण संवेदनशील प्रक्रिया असल्याचे सांगत, यामध्ये आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. शालेय साहित्य, गणवेश, संगणक साहित्य, टोनर, वाहनांचे सुटे भाग किंवा वाहन भाडे यांसारख्या विविध बाबींमध्ये असे करार केले जातात. काही प्रकरणांमध्ये करार न करताही खरेदी किंवा सेवा घेतल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

COMMENTS