Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीत अघोरी पूजा; माजी आमदार अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा

बारामती : राज्यात अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि अघोरी प्रथांबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर वातावर

पालघरमध्ये भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार
अजितदादांच्या फोटोपुढील ताटात टाचण्या टोचलेले लिंबू; अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फोटो केले शेअर
मुंबईतील भोंदू रिदम पांचाळला अटक; महापालिकेच्या गार्डनमध्ये करायचा अघोरी पूजा

बारामती : राज्यात अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि अघोरी प्रथांबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर वातावरण आधीच तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातापूर्वी काही ठिकाणी अघोरी पूजा झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये बारामतीतील सहयोग घर, काटेवाडी येथील निवासस्थान आणि विद्या प्रतिष्ठान परिसरात संशयास्पद अघोरी विधी पार पडल्याचा दावा केला आहे. हे प्रकार बाहेरून आलेल्या व्यक्तींनी करणे शक्य नसून, स्थानिक पातळीवरील काही प्रभावशाली घटकांचा सहभाग असू शकतो, असे त्यांनी सूचित केले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांचा जोर वाढला आहे. डिसेंबर 2025 मधील एका घटनेचा उल्लेख करत त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या एआय इमारतीच्या बांधकामाजवळ मध्यरात्री अघोरी पूजा करण्यात आल्याचा दावा केला. या संदर्भातील काही छायाचित्रेही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, दुसर्‍याच दिवशी सकाळी अजित पवार या ठिकाणी पाहणीसाठी येणार होते, असा उल्लेखही त्यांच्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय, 28 डिसेंबर 2025 रोजी त्याच परिसरात पुन्हा अशाच प्रकारचा विधी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या घटनांना भयावह असे वर्णन करत त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. काटेवाडीतील खताळपट्टा परिसरातही आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, अपघातापूर्वी एका ठिकाणी बोकड उलटा टांगून त्याखाली अघोरी पूजा करण्यात आल्याची चर्चा आहे. काही महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व दाव्यांमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी या घटनांमागील सत्य समोर यावे, अशी मागणी केली आहे. अंधश्रद्धेविरोधात भूमिका घेणार्‍या अजित पवार यांच्या परिसरातच असे प्रकार घडल्याचे त्यांनी अधोरेखित करत, यामागील जबाबदार घटकांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. या घडामोडींमुळे बारामतीसह राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, संबंधित दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे आणि तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS