वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिकच तीव्र होत असून, लष्करी हालचाली आणि राजनैतिक प्रयत्न एकाच वेळी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अम

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिकच तीव्र होत असून, लष्करी हालचाली आणि राजनैतिक प्रयत्न एकाच वेळी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन लष्करी विमान पाडल्याच्या घटनेमुळे इराणसोबतच्या चर्चांवर कोणताही परिणाम होणार नाही. हे युद्धाचे वातावरण आहे आणि आम्ही त्या परिस्थितीत आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. मात्र या दाव्याला स्वतंत्र पुष्टी मिळालेली नाही. संबंधित विमान जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यासाठी ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. दोन सदस्य असलेले अमेरिकेचे एक लढाऊ विमान इराणच्या हद्दीत कोसळल्याचे वृत्त आहे. त्यातील एका सदस्याला अमेरिकन सैन्याने सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी हलवले आहे, तर दुसरा सदस्य अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने संसदेतील सशस्त्र सेवा समितीला दिलेल्या माहितीनुसार, एक सैनिक सुरक्षित आहे; मात्र दुसर्याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. तो कुठे आहे किंवा त्याची स्थिती काय आहे, याबाबत अनिश्चितता कायम आहे. या पार्श्वभूमीवर, बेपत्ता सैनिकाला इजा पोहोचल्यास अमेरिकेची भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारला असता अध्यक्ष ट्रम्प यांनी थेट उत्तर देणे टाळले. अशी वेळ येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, एवढेच ते म्हणाले. ही घटना विशेष ठरते कारण दीर्घ काळानंतर शत्रूच्या प्रदेशात अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा समोर आला आहे. यापूर्वी अशी घटना इराक युद्धाच्या काळात घडली होती. सध्याच्या संघर्षात ही पहिलीच वेळ असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक आहे. दरम्यान, इराणी माध्यमांनी कथितपणे पाडलेल्या विमानाचे अवशेष दर्शवणारी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यामुळे वातावरण अधिकच तापले असून दोन्ही देशांमधील सुरू असलेली चर्चा जवळपास ठप्प झाल्याचे संकेत मिळत आहेत. इराणने प्रस्तावित चर्चेत सहभागी होण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे शांततेच्या शक्यता अधिकच क्षीण झाल्या आहेत. एकूणच, लष्करी कारवाया आणि अनिश्चिततेच्या छायेत अमेरिका-इराण संबंध अधिकच तणावपूर्ण व धोकादायक वळणावर पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.
विमानानंतर अमेरिकेचे हेलिकॉप्टर इराणने पाडले
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेचे एक लष्करी हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा करत परिस्थिती आणखी चिघळवली आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, हे हेलिकॉप्टर बेपत्ता झालेल्या अमेरिकन वैमानिकाचा शोध घेण्यासाठी इराणच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले होते. या घटनेनंतर परिसरात लढाऊ विमाने आणि शोध पथके मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली आहेत. इराणकडून दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वैमानिकाचा शोध सुरू असून त्याला जिवंत पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या सर्व दाव्यांना अमेरिकेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे. याआधीही इराणने अमेरिकेचे प्रगत लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. प्रारंभी हे अत्याधुनिक एफ-35 प्रकारचे विमान असल्याचे सांगण्यात आले होते.

COMMENTS