लखनऊ : उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे राजधानीत घडू पाहणारा मोठा स्फोटाचा कट उधळण्यात यश आले आहे. या प्रकरणी चार संश

लखनऊ : उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने वेळेवर केलेल्या कारवाईमुळे राजधानीत घडू पाहणारा मोठा स्फोटाचा कट उधळण्यात यश आले आहे. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीतून देशविरोधी कारवायांचे गंभीर धागेदोरे समोर येत आहेत.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संशयित परदेशातून कार्यरत असलेल्या सूत्रधारांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या सूचनांनुसार देशात दहशत पसरवण्याचा कट रचला जात होता. गर्दीची ठिकाणे, महत्त्वाच्या संस्था आणि रेल्वे परिसर ही संभाव्य लक्ष्ये ठरवण्यात आली होती. विशेषतः लखनऊ रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणा आणि इतर महत्त्वाच्या मालमत्तेवर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून रासायनिक द्रव्याने भरलेले भांडे, मोबाईल संच, प्रचारात्मक पत्रके तसेच ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मोबाईलमधील माहितीच्या आधारे तपास अधिक गतीने पुढे सरकत असून, काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा मेरठ परिसरातील रहिवासी असून, तो सामान्य व्यवसाय करत असतानाच सामाजिक माध्यमांद्वारे परदेशातील संशयित घटकांच्या संपर्कात आला होता. हळूहळू त्याने स्वतःभोवती सहकार्यांचे जाळे निर्माण केले आणि विविध शहरांतील तरुणांना या कारवायांमध्ये सामील करून घेतले. आर्थिक प्रलोभने आणि कट्टर विचारसरणीचा प्रभाव यामुळे हे तरुण या जाळ्यात अडकले, असे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. तपासात असेही उघड झाले आहे की, संशयितांनी विविध शहरांमध्ये जाऊन संभाव्य लक्ष्यांची पाहणी केली होती. गाझियाबाद, अलीगढ आणि लखनऊसह अनेक ठिकाणांची त्यांनी बारकाईने माहिती गोळा केली. ही माहिती चित्रफितींच्या स्वरूपात परदेशातील सूत्रधारांकडे पाठवली जात होती. त्यानुसार पुढील कारवायांचे नियोजन करण्यात येत होते.

COMMENTS