मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या प्रकरणात दिल्लीतील रा

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या प्रकरणात दिल्लीतील राऊझ ॲव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कुस्तीपटू बजरंग पूनिया यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावाला. या प्रकरणातील सह-आरोपी आणि डब्ल्युएफआयचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या बंद खोलीत या प्रकरणाची सुनावणी पार पडली. ६ महिला पैलवानांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. त्यांच्या तक्रारींनंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.
दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. लवकरच दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन पुढील न्यायालयीन लढा कसा लढायचा, याबाबत माहिती देणार आहोत, असे बजरंग पूनिया यांनी म्हटले आहे. माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, त्यांनी पूर्वी जे म्हटले होते ते आता सिद्ध झाले आहे. त्यांच्या वकिलांनी सांगितले की, न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहेत. तक्रार आणि तक्रारदाराच्या विधानांमध्ये अनेक विसंगती आणि विरोधाभास आहेत, ही त्यांची सुरुवातीपासूनच भूमिका आहे. न्यायालयाचा सविस्तर आदेश लवकरच जारी केला जाईल, त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीवर सविस्तर चर्चा केली जाईल.
दरम्यान, महिला पैलवानांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिनाभर तीव्र आंदोलन केले होते. देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेतल्यानंतर राऊझ एव्हेन्यू कोर्टाने पुराव्यांच्या अभावी ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे.

COMMENTS