माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उघडकीस आणत आरोपीला

माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून धारदार चाकूने वार करून ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने चौकशीत दिली आहे.
तालखेड येथील विकास दत्तात्रय वाघमोडे (वय 33) यांचा मृतदेह 29 जून रोजी त्यांच्या शेताजवळ आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहिती व स्थानिकांकडून माहिती संकलित केली. त्यावेळी मृत विकास वाघमोडे याचा काही दिवसांपूर्वी आदित्य बारवाळ याच्यासोबत गंभीर वाद झाल्याची माहिती समोर आली. त्या वादात आरोपीने विकासला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी आदित्य बारवाळ याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी पुणे येथे तसेच सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तालखेड फाटा येथे दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात असल्याने विकासचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार 28 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास विकासचा पाठलाग करून शेताकडे जाणार्या रस्त्यावर त्याला अडवले. त्यानंतर धारदार चाकूने पोटावर दोन आणि गळ्यावर एक वार करून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीची कबुली आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे त्याला पुढील कारवाईसाठी माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा उलगडा अल्पावधीत झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाची प्रशंसा होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड, माजलगाव ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयकुमार रामोड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने तसेच त्यांच्या पथकाने केली.

COMMENTS