Homeताज्या बातम्या

गोशाळांप्रमाणे गोवंश पाळणार्‍या शेतकर्‍यांनाही थेट अनुदान द्याबोगस गोशाळांची चौकशी करा-आम आदमी पार्टीची मागणी

बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना आम आदमी पार्टीच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने विविध मागण्यांच

गेवराईतील वाळू घोटाळा; तहसीलदारांसह प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल कराएसआयटी चौकशीचीही मागणी; गेवराईतील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
हज यात्रा 2027 साठी बीड जिल्ह्यातील इच्छुक यात्रेकरूंसाठी अर्ज प्रक्रिया सुरू29 जून ते 20 जुलैपर्यंत करता येणार अर्ज
राष्ट्रवादीमुळेच आमची घडी बसली-मोईन मास्टरअजितदादांनी सामान्य भीमकन्येला खुर्चीत बसवून सामाजिक न्यायाचा विचार जपला – प्रेमलताताई पारवे



बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना आम आदमी पार्टीच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. गोशाळांप्रमाणेच प्रत्यक्ष गोवंश पाळणार्‍या शेतकर्‍यांनाही थेट अनुदान व शासकीय सुविधांचा लाभ द्यावा, तसेच राज्यातील बोगस गोशाळांची उच्चस्तरीय चौकशी करून गैरव्यवहार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य व केंद्र शासनाकडून गोवंश संवर्धनासाठी गोशाळांना विविध प्रकारचे अनुदान, आर्थिक सहाय्य आणि सुविधा दिल्या जातात. मात्र प्रत्यक्ष आपल्या दावणीला गाय-बैल पाळणार्‍या शेतकर्‍यांना या योजनांचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोशाळांना दिल्या जाणार्‍या सुविधांप्रमाणेच शेतकर्‍यांनाही थेट अनुदान, चारा, पशुवैद्यकीय उपचार, विमा संरक्षण आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास आर्थिक संकटामुळे गोवंश विकण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे गोवंश संवर्धनाचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, मागील दोन वर्षांत गोसेवकांच्या माध्यमातून जप्त करण्यात आलेल्या गाई कोणत्या गोशाळांमध्ये दाखल करण्यात आल्या, त्यांची सद्यस्थिती काय आहे, याची उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी करण्यात आली. या प्रक्रियेत गैरव्यवहार अथवा बोगस काम करणार्‍या संस्था आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले. अनेक ठिकाणी, विशेषतः शहरी भागात, काही गोशाळा केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून शासनाच्या योजनांचा गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा गोशाळांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पशुधन संवर्धनाच्या सर्व योजना थेट गोवंश पाळणार्‍या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतील, अशी स्वतंत्र व प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणीही आम आदमी पार्टीने केली. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण, शहराध्यक्ष सय्यद सादेक (दादा), शहर सचिव मिलिंद पाळणे, तालुका उपाध्यक्ष आजम खान आणि दत्ता सुरवसे उपस्थित होते.

COMMENTS