जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथे घरात घुसून मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व भ्रमणध्वनी असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या ट

जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथे घरात घुसून मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व भ्रमणध्वनी असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा जामखेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात एका संशयितासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी मध्यरात्रीनंतर फक्राबाद येथील कौशल्या आढाव, त्यांची बहीण मैनाबाई पारे आणि कुटुंबीय घरासमोर झोपलेले असताना काही अज्ञात व्यक्तींनी घरावर धाड टाकली. घराबाहेर असलेल्या अंगद आढाव यांना कोयता, लोखंडी गज व काठ्यांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या मैनाबाई पारे यांनाही मारहाण करण्यात आली.
यानंतर आरोपींनी घरात प्रवेश करून कौशल्या आढाव व त्यांच्या आईला मारहाण केली. तसेच गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेत घरातील कपाटातील रोख रक्कम लंपास केली. याशिवाय एक भ्रमणध्वनीही चोरून नेला. या घटनेत एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. या प्रकरणी कौशल्या आढाव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे राशीन (ता. कर्जत) येथील कुणाल राजू भोसले याच्यासह काही साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विशेष पथकाने राशीन येथे सापळा रचून कुणाल भोसले व दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताला अटक करण्यात आली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार तुकाराम सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS