Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंधन पुरवठा सुरक्षित ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न; पुरवठा विस्कळीत होईल अशी साठेबाजी टाळा : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात
क्षितिज ठाकुरांना लागले विधान परिषदेचे वेध; बहुजन विकास आघाडीची शिंदे गटाशी जवळीक
राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; ठाकरे गटातील अनेक जण संपर्कात असल्याचा मंत्री शिरसाट यांचा दावा

मुंबई : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. मात्र, नागरिकांनी भीतीपोटी इंधनाची अनावश्यक साठेबाजी करू नये, अन्यथा पुरवठा व्यवस्थेवर अधिक ताण येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या जगभरात इंधन पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांनी इंधन आणीबाणी जाहीर केली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या जागतिक संकटाचा परिणाम भारतावरही जाणवत असला, तरी राज्यातील पुरवठा खंडित होऊ नये म्हणून शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्याला मिळणारा इंधन कोटा जवळपास तेवढाच आहे, मात्र भविष्यात टंचाई निर्माण होईल या भीतीने नागरिकांकडून अतिरिक्त खरेदी केली जात असल्याने मागणीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता इंधन साठवू नये, कारण कृत्रिम टंचाईमुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी विशेषतः शेतकऱ्यांचा उल्लेख करत सांगितले की, सध्या शेती हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे काही भागांत शेतकऱ्यांना डब्यांमधून डिझेल देण्यास प्रशासनाने तात्पुरती मुभा दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाखाली काही जण इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली असून अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. राज्यातील काही पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. काही गावांमध्ये आक्रमक वर्तन आणि गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या असून हिंसक प्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

विधानपरिषदेच्या जागांवर लवकरच निर्णय विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील चर्चांना सकारात्मक दिशा मिळत असल्याचे सांगितले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू असून लवकरच यावर अंतिम निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील १७ विधानपरिषदेच्या जागांचा निर्णय अंतिम होऊन महायुतीतील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS